Pune Mayor’s Office: मोठी बातमी ! पुणे महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी
Pune Mayor's Office: संबंधित ई-मेलमध्ये आयईडी बॉम्बस्फोटाचा उल्लेख करण्यात आला असून काही विशिष्ट तारखा आणि वेळांचाही संदर्भ देण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.

Pune Mayor’s Office: पुणे महापौर कार्यालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आल्याने प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. या ई-मेलमध्ये पुणे महापौर कार्यालयासह नागपूरमधील काही महत्त्वाच्या ठिकाणांना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाला लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
संबंधित ई-मेलमध्ये आयईडी बॉम्बस्फोटाचा उल्लेख करण्यात आला असून काही विशिष्ट तारखा आणि वेळांचाही संदर्भ देण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. (Pune Mayor’s Office)
धमकीचा ई-मेल प्राप्त होताच पोलिस, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच सायबर विभागाला सतर्क करण्यात आले. ई-मेलची सत्यता पडताळणे, तो नेमका कुठून पाठवण्यात आला ?आणि त्यामागे कोणाचा हात आहे? याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. (Pune Mayor’s Office)
सायबर तज्ज्ञांकडून ई-मेलचा स्त्रोत शोधण्याचे काम सुरू असून तो खरा आहे की केवळ अफवा पसरवण्यासाठी पाठवण्यात आलेला बनावट संदेश आहे, याचीही चौकशी केली जात आहे.
दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित परिसरांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली असून संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
तपास पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून सर्व आवश्यक खबरदारी घेतली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


