पुणे : लोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रविवारी (दि. 15) सर्वाधिक २१२ विमानांच्या फेऱ्या झाल्या. यापूर्वी २१० विमानांचा उच्चांक होता. त्यामुळे पुणे विमानतळावरून आतापर्यंत एका दिवसातील सर्वाधिक विमान उड्डाणाची नोंद झाली. पुणे येथील विमानतळावरून देशातील विविध राज्यांसह परदेशात विमान उड्डाणे होतात. या ठिकाणाहून दिवसाला सरासरी २०० ते २०४ विमान उड्डाणे होत आहे. सरासरी ३२ ते ३३ हजार प्रवासी या विमानतळावरून दररोज प्रवास करत आहेत. मात्र, त्यामध्ये प्रत्येक रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने विमान उड्डाणांच्या संख्येत वाढ होत असते. पुणे विमानतळाला उन्हाळी हंगामामध्ये हवाई दलाने २१८ स्लॉट (विमान उतरण्याची व उड्डाणांची संख्या) दिलेले आहेत. त्यापैकी २१२ स्लॉटचा रविवारी वापर करण्यात आला. आता सर्वाधिक उड्डाणे झाल्यामुळे प्रवाशांचा फायदा होणार असून, त्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता विमानतळ प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.