Pune : महापालिका आयुक्त बंगल्यातील वीस लाखांचे साहित्य गायब ?

पुणे : महापालिका आयुक्तांच्या मॉडेल कॉलनी येथील निवासस्थानातून मोठया प्रमाणावर महागडे साहित्य गायब झाले आहे. नवीन आयुक्तांनी ताबा घेण्यासाठी हे निवासस्थान उघडल्यावर हा प्रकार समोर आला. ही घटना झाली असली तरी ती लपविण्याचा प्रयत्न पालिकेच्या पातळीवरून सुरू होता. दरम्यान, गायब झालेले साहित्य खरेदी करण्यासाठी विद्यूत विभागाने निविदाही प्रसिद्धीस दिली आहे.
हे साहित्य गायब
गेले दीड महिना हे निवासस्थान बंद होता. ते उघडल्यानंतर अनेक वस्तू गायब झाल्याचे आढळले. गायब साहित्यामध्ये जुन्या काळातील ब्राँझचे दिवे, झुंबर, चार एसी, किचन टॉप युनिट, डायनिंग टेबल, दोन एलईडी टीव्ही अशा महागड्या, दुर्मिळ वस्तूंचा समावेश असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर नामुष्की टाळण्यासाठी मालमत्ता व्यवस्थापन तसेच भवन विभाग हा प्रकार लपविण्याचा प्रयत्न करत होते.
दरम्यान, हे साहित्य नव्याने घेण्यासाठी शिवाजीनगर-घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने नव्याने निविदा काढली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या परिसरात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही असताना, तसेच बंगल्यावर २४ तास सुरक्षा रक्षकांचा पहारा असताना हे साहित्य गायब झाले कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी पालिकेचा कोणताही अधिकारी बोलण्यास तयार नाही.
बंगल्याची जबाबदारी कोणाकडे?
पालिकेच्या मिळकतींचे व्यवस्थापन मालमत्ता व्यवस्थापन विभाग करते. या बंगल्यात काही कामे करायची असल्यास अथवा खरेदी करायची असल्यास भवन विभाग ही कामे करते. त्यामुळे या निवासस्थानातील साहित्याची यादी करणे, तसेच बंगला सोडताना किंवा नवीन अधिकारी बंगला ताब्यात घेताना, बंगल्यातील साहित्यांची तपासणे आवश्यक असते.
महापालिकेचे नवे आयुक्त नवल किशोर राम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना हा बंगला निवासासाठी दिला जाणार होता. त्यासाठी भवन विभागाने बंगल्यातील साहित्याची तपासणी केली. या तपासणीवेळी अनेक वस्तू गायब असल्याचे समोर आले.
या प्रकाराचा अधिकाऱ्यांना धक्का बसला. हे सामान नेमके कुठे गेले, याचा थांगपत्ता लागत नसल्याने हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे, नवीन आयुक्तांना राहण्यासाठी घर द्यायचे असल्याने तसेच आवश्यक कामे करायची असल्याने हे गायब झालेले सामान नव्याने खरेदी करण्यात येत असल्याचे विद्यूत विभागाकडून सांगण्यात आले.
प्रशासन गप्प का?
हा प्रकार माहित झाल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी पालिकेचा भवन विभाग, सामानाची खरेदी करणारा विद्यूत विभाग, मिळकतीची जबाबदारी असलेला मालमत्ता व्यवस्थापन विभाग, आयुक्त कार्यालय तसेच सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र हा प्रकार माहित असूनही, अधिकाऱ्यांनी आयुक्त बंगला कोणाच्या ताब्यात येतो, त्याचे नियोजन कोण बघते, तो कधीपासून बंद होता, तो कधी उघडण्यात आला, याची माहिती देण्यास नकार दिला. मात्र हा प्रकार घडल्याची कबुली अधिकारी खासगीत देत आहेत. त्यामुळे हे सामान चोरी झाले की कोणी लंपास केले, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.





