pune: हांडेवाडी चौकातील चार फर्निचर दुकानांना भीषण आग
Pune:

अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली
पुणे – हडपसर-कात्रज बायपास रोडवरील हांडेवाडी चौक येथे शिवेंद्र हॉटेलशेजारी असलेल्या चार फर्निचर व व्यावसायिक दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत मोठ्या प्रमाणावर फर्निचर, विद्युत साहित्य आणि इतर माल जळून खाक झाला. मात्र, अग्निशमन दलाच्या वेगवान आणि समन्वयपूर्ण कारवाईमुळे शेजारील पेट्रोल पंप व हॉटेलपर्यंत आगीचा फैलाव होण्यापासून रोखण्यात यश आले.
आगीची माहिती मिळताच काळेपडळ अग्निशमन केंद्राची पहिली फायरगाडी घटनास्थळी दाखल झाली आणि तातडीने आग विझविण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यानंतर कोंढवा बुद्रुक, कोंढवा खुर्द, हडपसर, गंगाधाम आणि मध्यवर्ती अग्निशमन केंद्रांसह एरंडवणा येथील वॉटर टँकर, तसेच महापालिका आणि स्थानिक पाणी टँकर घटनास्थळी दाखल झाले. अनेक तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.
आगीत फर्निचर हाऊस, सजावट फर्निचर, वीरभद्र फर्निचर आणि टेक्नोफास्ट इलेक्ट्रिक या प्रत्येकी सुमारे दोन हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या दुकानांचे मोठे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण आणि आर्थिक नुकसानीचा अंदाज अद्याप स्पष्ट झालेला नाही.
आग विझविण्याच्या कारवाईदरम्यान दुकानात असलेला एलपीजी गॅस सिलिंडर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. त्यामुळे संभाव्य स्फोटाचा धोका टळला. घटनास्थळालगत पेट्रोल पंप आणि शिवेंद्र हॉटेल असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग त्या भागापर्यंत पोहोचू न देता मोठा अनर्थ टाळण्यात आला.
या बचाव आणि अग्निशमन मोहिमेत स्टेशन ऑफिसर समीर शेख, अनिल गायकवाड, सुनील नाईकनवरे, प्रभारी अधिकारी विलास दडस, कैलास शिंदे यांच्यासह अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई पार पडली.





