पुणे : पोलिसांच्या पेट्रोल पंपावरच हेराफेरी

पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांच्या कल्याण शाखेअंतर्गत पाषाण आणि बाणेर रस्त्यावर चालविण्यात येणाऱ्या दोन पेट्रोल पंपांवर कामगारांनी हेराफेरी करून तब्बल 20 लाख 19 हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी, पोलीस कर्मचारी राजेश घायाळ (53) यांनी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विमल जेम्स, सुनीता ननावरे, सुरज पाथरे, रेवती पाटील, अक्षय जगताप, आनंता चांदणे आणि इतर पन्नास, अशा एकूण 56 कामगारांविरुद्ध अपहार करून संगनमताने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना जून 2021 ते मार्च 2023 या कालावधीत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण पोलिसांच्या कल्याण शाखेच्या माध्यमातून बाणेर आणि पाषाण रस्त्यावर दोन पेट्रोल पंप सुरू करण्यात आले आहेत. तेथे हे आरोपी कामगार म्हणून काम करत होते. त्यांना ग्राहकांनी इंधन भरल्यानंतर दिलेले रोख पैसे त्यांनी पंपाच्या खात्यात जमा न करत आपल्याकडे ठेवून घेतले. दरम्यान इंधनाची झालेली विक्री आणि जमा झालेले पैसे याचा ताळमेळ बसत नसल्याचे लक्षात आल्यानंतर व्यवस्थापनाने सीए शेखर भगरे यांच्यामार्फत त्याचे ऑडीट केले.
त्यावेळी त्यांनी दिलेल्या अहवालात बाणेर रोडवरील पंपावर 17 लाख 25 हजार 324 रुपये तर पाषाण रोड येथील पंपावर 2 लाख 93 हजार 736 रुपयांचा अपहार झाल्याचे दिसून आले. हा प्रकार समोर आल्यानंतर ग्रामीण पोलिसांकडून घायाळ यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गुरव करीत आहेत.




