Pune : `विद्यापीठातील अभ्यासक्रमाची माहिती देण्याची व्यवस्था करा’

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया आणि शुल्काबाबतची सविस्तर माहिती देण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना विद्यापीठ प्रशासनाने केल्या आहेत.
याबाबत उपकुलसचिव डाॅ. एम. व्ही. रासवे यांनी परिपत्रक काढले आहे. सध्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशाची लगबग सुरु आहे. बारावी निकालानंतर पालक, विद्यार्थी अभ्यासक्रमाची माहिती घेण्यासाठी विद्यापीठात येतात. त्यांना प्रवेशाची माहिती मिळत नाही. तसेच कोणते अभ्यासक्रम सुरु आहेत, त्याचे शुल्क काय याची माहिती मिळत नाही.
विद्यापीठात प्रवेशाची सविस्तर माहिती, अभ्यासक्रम व शुल्काची माहिती विद्यार्थी व पालकांना त्वरित मिळावी, अशी व्यवस्था होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने विद्यापीठातील विभागांनी व्यवस्था करावी, असे विद्यापीठाने परिपत्रकात नमूद केले आहे.
शैक्षणिक विभागाने ही सर्व माहिती दर्शनी भागात लावल्यास ते संयुक्त ठरेल. प्रवेशासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती मिळावी, यासाठी पावले उचलावीत, असेही परिपत्रकात म्हटले आहे.





