Pune : वॉर्ड रचना करताना मोठे फेरबदल? महापालिकेत समाविष्ट गावांकडून वॉर्ड संख्येबाबत अपेक्षा

संतोष गव्हाणे
पुणे – पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गट आणि पंचायत समिती गणांची प्रारूप यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली. या गट- गणांची रचना करताना मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. प्रामुख्याने पुणे शहरालगतची गावे पालिकेत समाविष्ट झाल्याने गट- गणांची संख्या घटली आहे. हवेली तालुक्याचा विचार करता 13 गट आणि 26 गणांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.
शहराच्या हद्दीवरील गावे प्रथमच महापालिकेच्या निवडणुकीला सामोरी जात असताना या गावांत वॉर्ड रचना करताना मोठे फेरबदल होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार पुणे महापालिकेच्या हद्दीत 34 गावे टप्प्याटप्प्याने समाविष्ट करण्यात आली.
पहिल्या टप्प्यात 4 ऑक्टोबर 2017 मध्ये लोहगाव आणि मुंढव्यातील उर्वरित भाग, साडेसतरानळी, उत्तमनगर, शिवणे, आंबेगाव खुर्द, उंड्री, धायरी, आंबेगाव बुद्रुक, फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही 11 गावे समाविष्ट झाली, तर 30 जून 2021 मध्ये उर्वरित महाळुंगे, सूस, बावधन बुद्रुक, किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नर्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदेवाडी, नांदेड, मांगडेवाडी, निंबाळकरवाडी, भिलारेवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, वाघोली या 23 गावांचा समावेश करण्यात आला. या कालावधीत (दोन नगरसेवक वगळता) गावांना एकही स्थानिक नगरसेवक मिळालेला नाही.
दरम्यानच्या काळात 2023 मध्ये फुरसुंगी आणि उरूळीदेवाची ही दोन गावे महापालिकेतून बाहेर पडली. त्या गावांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापन होणार असल्याने महापालिकेडून मूलभूत सुविधांसाठीही दुर्लक्षित असलेल्या गावांनी स्वतंत्र नगरपरिषद किंवा स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याचा सूर आळवला. यातून स्वतंत्र कारभार, तसेच नगरसेवक पदांची संख्या वाढून सर्वच इच्छुकांना संधी मिळेल, अशी सुप्त अपेक्षा होती.
मात्र, याच कालावधीत पुणे महापालिका निवडणूक होणार, होणार या चर्चेत दोन-तीन वर्षांचा कालावधी गेला. आता न्यायालयानेच आदेश दिल्याने 2025 च्या अखेरपर्यंत महापालिकेची निवडणूक होणार असल्याने समाविष्ट गावांतून प्रथम नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्यांची संख्या फार मोठी आहे.
…समाविष्ट गावांतून कमी नगरसेवक?
पुणे महापालिकेत समाविष्ट 11गावांसाठी 2017 मध्ये पोटनिवडणूक झाली. त्यासाठी 2011च्या जनगणनेचा निकष लावला होता. त्यामुळे 11 गावांसाठी केवळ 2 नगरसेवक मिळाले. आता, फुरसुुंगी-उरूळीदेवाची ही गावे वगळता तब्बल 32 गावांत प्रथमच महापालिका निवडणूक होत आहे. ही निवडणूक पुन्हा 2011च्याच जनगणनेनुसार होणार असल्याने 5 ते 6 नगरसेवक निवडून येऊ शकतील.
मुळात या गावांची सध्याची लोकसंख्या आणि कागदोपत्री लोकसंख्या यामध्ये लाखोंचा फरक आहे. निकषानुसार 85 हजार लोकसंख्येचा एक प्रभाग असल्यास या गावांतून निवडून येणार्या नगरसेवकांची संख्या खूपच कमी असू शकते. शहरालगतच्या 32 गावांचा विकास होण्यासाठीच या गावांचा समावेश महापालिकेत करण्यात आला आहे. असे असताना प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या लोकसंख्येनुसार नगरसेवक निवडून येणार नसतील, तर या गावांना कमी निधी मिळेल, हे उघड आहे.
‘महापालिका निवडणूक घेताना समाविष्ट गावातील लोकसंख्येचा विचार करावा. शासनाने गावांची वाढलेली मतदारसंख्या लक्षात घेऊनच हद्दवाढीतील समाविष्ट गावांची वॉर्ड रचना करावी. वॉर्ड रचनेत आम्हाला वेगळा न्याय का, या मुद्द्यावर 32 गावांतील प्रतिनिधींची बैठक घेतली असून, याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत. त्यानंतरही गावांच्या दृष्टिकोनातून निवडणूक प्रक्रियेत योग्य ते बदल केले गेले नाहीत, तर आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहोत.’ – श्रीरंग चव्हाण, अध्यक्ष, 34 गाव कृती समिती





