पुणे : महामेट्रोकडून वनाज ते चांदणी चौक या विस्तारीत मेट्रो मार्गाचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. या मेट्रो मार्गासोबतच पौड रस्त्यावर कचरा डेपोपासून लोहिया आयटी पार्कपर्यंत दुमजली उड्डाणपूल उभारला जाणार आहे. याचा आराखडा महामेट्रोने महापालिकेस सादर केला आहे. या पुलासाठी महामेट्रोकडून ८५ कोटींचा खर्च अपेक्षीत धरण्यात आला आहे. त्यामुळे, पौड रस्त्यावर कोथरूड डेपो परिसरात होणारी वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. शहराचे पश्चिम प्रवेशद्वार म्हणून पौड रस्ता ओळखला जातो. तसेच पौड आणि पुणे- मुंबई महामार्गाकडे जाणारा हा शहरातील सर्वात जवळचा रस्ता आहे. परिणामी, या रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी मोठी गर्दी असते, लोहिया आयटी पार्क ते कचरा डेपोपर्यंत तीन सिग्नल असल्याने तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती असल्याने सुमारे दिड कि.मी.च्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. ही बाब लक्षात घेवून पालिकेकडून या रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन होते. मात्र, आता महामेट्रोकडून वनाज ते चांदणी चौका पर्यंत मेट्रोचे विस्तारीकरण केले जाणार आहे. त्यामुळे नळस्टाॅप येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपूलाच्या धर्तीवर कोथरूड डेपोच्या समोरही उड्डाणपूल उभारला जाणार आहे. खर्चाबाबत संभ्रम… महामेट्रोकडून नळस्टाॅप येथील उड्डाणपूल उभारण्यात आल्यानंतर कामात बदलण्यात करण्यात आल्याने काम पूर्ण झाल्यानंतर महामेट्रोने महापालिकेकडे मान्यते पेक्षा अधिक ५२ कोटींची मागणी केली. मात्र, पालिकेने त्यास नकार दिला. त्यानंतर पुन्हा या खर्चाची महापालिकेने सीओईपी कडून तपासणी करून घेण्यात आली. त्यानंतर हा खर्च ३६ कोटी निश्चित करण्यात आला. तसेच तो महामेट्रोला देण्यात आला. त्यामुळे आता महापालिकेकडून या कामाच्या आधीच महामेट्रोकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या खर्चाची तपासणी केली जाणार आहे.