pune : कमी दराच्या निविदा ही चिंताजनक बाब
Pune:

महापालिका प्रशासनाने दिली मुख्य सभेत कबुली
pune : महापालिकेने जाहीर केलेल्या निविदांच्या दरापेक्षा जवळपास निम्म्या दराने निविदा येणे, ही चिंताजनक बाब असल्याचे मत महापालिका मुख्य सभेत नगरसेवकांनी व्यक्त केले. त्याला प्रशासनानेही दुजोरा दिला असून, यासंदर्भात एक कडक नियमावली (एसओपी) बनवण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिका मुख्य सभेला मंगळवारी दिली.
चोवीस तास पाणीपुरवठा प्रकल्पाशिवाय हडपसरमध्ये अन्य दोन प्रकल्पांच्या सुमारे ५०० कोटी रुपयांच्या कामाच्या निविदा या महापालिकेने दिलेल्या दराच्या सुमारे ४३.५९ टक्के कमी दराने आल्या आहेत. ही सगळी कामे मुख्यत्वे पाइपलाइनची आहेत. एवढ्या कमी दराने निविदा आल्या, तर त्या कामाचा दर्जा काय असेल, कामाची शाश्वती दिली जाईल का, असे प्रश्न सभागृह नेते गणेश बिडकर यांनी उपस्थित केला.
हा ट्रेंड महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. याची नीट पडताळणी केली पाहिजे, अशा निविदांमधून केली जाणारी कामे नीट झाली आहेत की नाही, हे काटेकोरपणे तपासण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली पाहिजे, असे बिडकर यांनी प्रशासनाला सांगितले. त्यावर शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी उत्तर दिले.
काही खात्यात कमी दराच्या निविदा (बीलो टेंडर) येण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यामुळे ही चिंतेची बाब आहे. यावर चर्चा करण्यासाठी एक समिती नेमली असून, त्यावर विचारविनिमय होऊन एक कडक एसओपी बनवण्यात येणार असल्याचे, पावसकर म्हणाले.
अशा निविदा येणे हे चुकीचे आहे. यासाठी एक एसओपी तयार करण्यात येईल. त्यावर चर्चा सुरू आहे. लोकप्रतिनिधींचे मतही त्यात विचारात घेण्यात येईल.
– नवलकिशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका





