Sarjerao Kumbhar : पुण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे निधन; पोलिस दलात हळहळ
Sarjerao Kumbhar : लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार (५०) यांचे शनिवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

Sarjerao Kumbhar : लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव शामराव कुंभार (वय ५०) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास निधन झाले.
त्यांच्या आकस्मिक निधनाने पुणे ग्रामीण पोलिस दलासह वाघोली-लोणीकंद परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांच्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील चावरे या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सर्जेराव कुंभार हे सध्या वडगावशेरी येथे वास्तव्यास होते. शनिवारी रात्री सुमारे दहा वाजता ड्युटी आटोपून ते घरी परतले होते.
मध्यरात्री त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तत्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
ऑक्टोबर २०२४ मध्ये घेतला होता पदभार
सर्जेराव कुंभार यांनी १२ ऑक्टोबर २०२४ रोजी लोणीकंद पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता. कर्तव्यदक्ष, शांत आणि संयमी अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती.
कायदा-सुव्यवस्थेतील ठोस कामगिरी
पेरणेफाटा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या नियोजन आणि सुरक्षेची जबाबदारी त्यांनी सलग दोन वर्षे यशस्वीपणे पार पाडली होती. तसेच, वाघोलीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक युवराज हांडे सुट्टीवर असताना २५ ते २७ जानेवारीदरम्यान लोणीकंद व वाघोली या दोन्ही पोलिस ठाण्यांचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे होता. याच कालावधीत वाघोलीत घडलेल्या दोन खुनांच्या घटनांतील आरोपींना त्यांनी तत्काळ अटक करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली, यामुळे त्यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक झाले होते.
‘सुरक्षित पुणे’ पुरस्काराने सन्मान
त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी २०२५ मध्ये त्यांना ‘सुरक्षित पुणे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी त्यांचा संवाद अत्यंत सौहार्दपूर्ण होता. कायम हसतमुख स्वभावामुळे ते सर्वांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करू शकले.
परिवारावर दु:खाचा डोंगर
त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. मुलगा सिद्धेश आणि मुलगी सिद्धी हे दोघेही शिक्षण घेत असून, मुलगी सिद्धी ही बीएएमएसचे शिक्षण घेत आहे.





