Pune Lonavala Railway – महाराष्ट्र शासनाच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसरा व चौथा ट्रॅक उभारण्यासाठी ५१०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्यानंतर या प्रकल्पाला गती देण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. दिल्ली येथे रेल्वेमंत्री वैष्णव यांची खासदार बारणे यांनी भेट घेतली. या वेळी पुणे-लोणावळा मार्गावरील वाढती प्रवासी संख्या, सध्याच्या दोनच ट्रॅकवरील रेल्वे वाहतुकीमुळे निर्माण होणारी मर्यादा आणि भविष्यातील गरज याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. या बैठकीला छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे देखिल उपस्थित होते. खासदार बारणे यांनी सांगितले की, पुणे-लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा सुरू असून दररोज सुमारे एक ते सव्वा लाख प्रवासी या सेवेचा लाभ घेतात. मात्र या मार्गावर सध्या केवळ दोनच ट्रॅक असल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढविणे शक्य होत नाही. त्यामुळे या मार्गावर तिसरा आणि चौथा ट्रॅक उभारणे अत्यावश्यक झाले आहे.त्यामूळे रेल्वे गाड्यांची संख्या वाढविणे शक्य होईल. सन २०१७ मध्ये पुणे-लोणावळा लोहमार्गावर तिसरा व चौथा ट्रॅक उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे विभागाने या प्रकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण करुन ट्रॅकसाठी आवश्यक जागाही उपलब्ध केली होती. मात्र राज्य सरकारकडून निधीची तरतूद न झाल्याने प्रकल्प रखडला होता. मात्र नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी ५१०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा खर्च केंद्र व राज्य सरकार प्रत्येकी ५० टक्के अशा प्रमाणात उचलणार आहेत. त्यामुळे आता रेल्वे मंत्रालयाने तातडीने कामाला गती द्यावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.या मागणीवर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून राज्य सरकारकडून निधीची तरतूद झाल्याने केंद्र सरकारकडूनही पुढील प्रक्रिया गतीने पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिल्याची माहिती खासदार बारणे यांनी दिली.