Pune : कर्जाचे वसुली दाखले मिळणार ऑनलाइन

पुणे : सहकारी बॅंका, पतसंस्था यांच्याकडून कर्जदाराने घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी वसुली दाखले देण्यासाठी सहकार विभागाने संगणक प्रणाली तयार करण्याचे काम सुरु केले आहे. या सुविधेमुळे वसुली दाखल्यांसाठी सहकार विभागाकडील उपनिबंधक कार्यालयात जावे लागणार नाही.
सहकारी बँका, पतसंस्था आणि गृहनिर्माण सोसायट्यांना सभासदांकडून थकीत कर्ज वसुलीसाठी सहकार खात्याकडून विविध प्रकाराचे दाखले घ्यावे लागतात. सध्या त्यासाठी सहकार खात्याकडे हेलपाटे मारावे लागतात. त्यास लागणार वेळ पाहता ही प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी सहकार खात्याने हे पाऊल उचलले आहे.
त्यासाठी सॉफ्टवेअर विकसित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. बँका, पतसंस्था आणि गृहनिर्माण सोसायट्यांना थकीत रक्कम वसुलीसाठी सहकार विभागाकडून प्रामुख्याने सहकारी अधिनियमातील कलम १०१, अंतर्गत वसुली प्रक्रियेसाठी हे दाखले उपलब्ध करून दिले जातात.
तसेच आवश्यक ती कागदपत्रे आणि पुराव्यांसह अर्ज केल्यास सहकार खात्याकडून तातडीने वसुली प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते, अशी माहिती सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

