Pune : चित्रपटांप्रमाणे मराठी मुक्त संगीतालाही अनुदान मिळावे

पुणे : स्वतंत्र संगीताला चित्रपटांचा आधार नसतो, येथे कलाकार आपण कसे व्यक्त व्हायचे हे स्वत: ठरवतो. त्यामुळे मराठी मुक्त संगीताला स्टार्ट अप असल्यासारखे समजून त्याची सरकार दरबारी नोंद व्हावी आणि मराठी चित्रपटांना जसे अनुदान मिळते तसे अनुदान मराठी मुक्त संगीताला मिळावे अशी अपेक्षा गायिका वैशाली सामंत यांनी व्यक्त केली. संगीतकार अजय नाईक आणि कौस्तुभ दबडगे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र कलामंच आणि जस्ट कोलॅब यांच्या वतीने पहिल्या मराठी इंडी म्युझिक (मिमा) अवॉर्ड्स सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी चित्रपटेतर (नॉन फिल्म) संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल यावेळी ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. गायक-संगीतकार अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर यांना मराठी इंडी म्युझिक आयकॉन पुरस्काराने गौरवले गेले. पं. रघुनंदन पणशीकर, आनंद भाटे आणि पं. संजीव अभ्यंकर यांना शास्त्रीय संगीत विभागात सर्वोत्कृष्ट गायक पुरस्काराने तर जीवन धर्माधिकारी आणि विवेक काजवेकर यांना संगीत संयोजन विभागासाठीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर सर्वदूर मराठीचे वातावरण आहे, या पार्श्वभूमीवर अशोक पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी मुक्त संगीताला अनुदान मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांकडे येत्या २० तारखेआधी निवेदन देऊ, असे आ. लाड म्हणाले. यावेळी संगीतकार मिलिंद इंगळे, संदीप खरे, सलील कुलकर्णी, अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, रघुनंदन पणशीकर, आनंद भाटे, पं. संजीव अभ्यंकर, जीवन धर्माधिकाररी विवेक काजवेकर आदींचा विविध पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. आर जे राहुल यांनी सूत्रसंचालन केले.





