Pune : पर्यटनावरील सरसकट बंदी मागे घ्या !

पुणे – जिल्ह्यातील साहसी पर्यटनावर सरसकट घातलेल्या बंदीला तीव्र विरोध होत आहे. सरसकट बंदी घालण्याऐवजी उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे. पर्यटन स्थळावरील ग्रामस्थ, व्यावसायिक, पर्यटन कंपन्या, ट्रेकर, हॉटेल, वाहतूक व्यावसायिकांनी पत्रकार परिषद घेऊन सरसकट बंदी रद्द करून अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली.
कुंडमळा दुर्घटनेतील चार पर्यटकांचा मृत्यू आणि अंधारबनमध्ये होणाऱ्या प्रचंड गर्दीनंतर सरकारने काही पर्यटन स्थळांवर ३१ ऑगस्टपर्यंत बंदी घातली आहे. या बंदीला पर्यटनावर अवलंबून असणाऱ्यांचा विरोध असल्याचे एक्सप्लोरर्स ट्रेक आणि टूर्सचे आनंद केंजळे म्हणाले.
केंजळे म्हणाले की, या बंदीमुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या गावांतील आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. बुकींग घेतलेल्या ट्रेक, टूर कंपन्या, हॉटेस व्यावसायिकही या बंदीमुळे अडचणीत आले आहेत. पर्यटनांवर अवलंबून असलेले वाहन चालक, छोटे टपरीवाल्यांवर बरोजगारीची वेळ आली आहे. त्यामुळे पर्यटनावर सरसकट बंदी घालण्याऐवजी अपघात टाळण्यासाठी उपाययोजना, नियम करावे.
जर विमान अपघात झाल्यानंतर विमानसेवा सुरू राहते तर साहसी पर्यटनांवर बंदी का, असा प्रश्न आहे. पावसाळ्यात ट्रेकिंग, रॅपलिंग, राफ्टिंग आणि कॅम्पिंगसारखे साहसी पर्यटन सुरू असते. पर्यटनाच्या काळातच त्यावर बंदी घातली तर देशभरात चुकीचा संदेश जाईल. यामुळे साहसी पर्यटनावरील सरसकट बंदी रद्द करावी.





