Pune : प्लॅटफॉर्म एक, सहावर लिफ्ट सुविधा सुरू

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि सहावर अखेर प्रवाशांसाठी लिफ्ट सेवा सुरू झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रवाशांकडून लिफ्टची मागणी होत असून आता ती पूर्ण झाली आहे. लिफ्टमुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला आणि लहान मुलांना फ्लॅटफाॅर्मवर येणे-जाणे सोयीचे होईल.
केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते लिफ्ट व पिण्याच्या पाण्याच्या कुलरचे उद्घाटन झाले. यावेळी पुणे रेल्वे विभागाचे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा, अपर व्यवस्थापक पी. यू. जाधव, वरिष्ठ मंडल विद्युत अभियंता (सामान्य) पराग आकणूरवार आदी अधिकारी उपस्थित होते.
पुणे विभागातील सर्वात मोठे, वर्दळीचे स्थानक म्हणून पुणे रेल्वे स्टेशन ओळखले जाते. येथून दिवसाला १५० पेक्षा जास्त गाड्या धावतात. त्यामधून साधारण सव्वा ते दीड लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, रेल्वे स्टेशनवर एकही लिफ्ट नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला यांना बॅगा घेऊन प्लॅटफॉर्मवर जाण्यास तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यासाठी सर्व फ्लॅटफाॅर्मवर लिफ्ट सुविधा असावी अशी मागणी वारंवार केली जात होती. अखेर लिफ्ट बसविण्यास मंजुरी मिळून कामा सुरवात झाली आणि चार लिफ्टपैकी दोन लिफ्ट सुरू झाल्या.
प्लॅटफॉर्म १ आणि ६ वरील लिफ्ट सुरू झाली असली तरी चार आणि पाच वरील लिफ्टचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. हे काम होण्यास आणखी काही महिने लागतील. तसेच दोन आणि तीनवरील लिफ्टच्या कामाला पाच- सहा महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चार प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांना आणखीन काही महिने लिफ्टची वाट पहावी लागणार आहे.




