पुणे : कोणीही पत्रं दिली तरी त्यांनी सुचविलेली कोणतीही कामे अंदाजपत्रकात स्विकारली जाणार नाहीत. केवळ, प्रशासनाला योग्य वाटणारीच कामे स्विकारली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या अंदाजपत्रकातील निधी तरतूदीवरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. तर, या अंदाजपत्रकात भाजपच्या माजी नगरसेवक आणि आमदारांनी सुचविलेल्या कामांचा समावेश केल्याचा आरोप महापालिका प्रशासनावर केला आहे. त्यावर, महापालिका आयुक्तांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणूका मे महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे, या निवडणूकांना सामोरे जाताना आपल्या प्रभागात महापालिकेचा जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी माजी नगरसेवक, आमदार आणि भावी नगरसेकवकांची चढाओढ सुरू असून, महापालिकेकडे निधीच्या मागणीची शेकडो पत्रं आली आहेत. त्या पेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे प्रत्येक पत्रात ५० ते १०० कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे आणि सोलापूरच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत महापालिकेचे अंदाजपत्रक तसेच डीपीसीत आपल्याला अंदाजपत्रकात मोठे घबाड मिळणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यासाठी महापालिकेस पत्रही देण्यात आल्याचे ते म्हणाले होते. त्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. महापालिकेतील माजी विरोधीपक्षांकडूनही समान निधीची मागणी केली जात आहे. यावर बोलताना आयुक्त म्हणाले की, महापालिकेच्या अंदाजपत्रकासाठी या वर्षी मोठया प्रमाणात पत्रं आली आहेत. अंदाजपत्रकाच्या बैठका सुरू असल्या तरी कोणीही गुपचूप अथवा भेटून पत्रं दिलेली नाहीत. प्रत्येकाकडून कार्यालयात पत्र देण्यात आली आहेत. यात माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी तसेच निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांच्या पत्रांचाही समावेश आहे. त्यात सुमारे ५० ते १०० कोटींची मागणी करण्यात आली आहे. मात्र, असा निधी देणे शक्य नाही. त्यामुळे अंदाजपत्रकात केवळ प्रशासनाला संयुक्तिक वाटतील तीच कामे घेतली जातील. महाविकास आघाडी आक्रमक राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून शहरातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अंदाजपत्रकात केवळ भाजपच्या नगरसेवकांच्या प्रभागात निधी दिल्याचे आढळून आल्यास या प्रकरणी महापालिकेविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा महाविकास आघाडीकडून पत्रकार परिषदेत देण्यात आला. राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, वसंत मोरे, अशोक हरणावळ, सचिन दोडके यावेळी उपस्थित होते. अशा प्रकारे प्रशासकांकडून काही ठरविक प्रभागातच अंदाजपत्रकात निधी दिल्याचे समोर आले तर तो शहरातील मतदारांबाबत भेदभाव करण्याचा प्रकार असेल, अशी टिकाही या नेत्यांनी केली.