Pune : कामगार हितासाठी योग्य निर्णय घेऊ

पुणे : कामगार हितासाठी १०० दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. यामध्ये कामगरांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेतले जातील, असे आश्वासन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले आहे. तसेच, या १०० दिवसांच्या कालावधीमध्ये आपण दिलेल्या निवेदनबाबत कृती समिती बरोबर बैठक घेणार असल्याचे आश्वासनही फुंडकर यांनी यावेळी दिले आहे.
ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्यासह शिष्टमंडळाने मंगळवारी मुंबई येथे फुंडकर यांची भेट घेतली. त्यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड कामगार युनियन अध्यक्ष संतोष नांगरे, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ उपाध्यक्ष राजकुमार घायाळ व हमाल पंचायतचे सचिव गोरख मेंगडे आदि उपस्थित होते. तसेच विविध मागण्यांचे निवेदन फुंडकर यांना यावेळी दिले.
महाराष्ट्र राज्य माथाडी सल्लागार मंडळांची तातडीने रचना करण्यात यावी. माथाडी मंडळावर स्वतंत्र्य अध्यक्ष व सचिव नेमावा, माथाडी मंडळात कर्मचारी संख्या नगण्य आहे. विशेष म्हणजे तेथील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा भार शासनावर नाही. त्यामुळे तेथील कर्मचारी नियुक्त करावेत, राज्यात अनेक ठिकाणी खासगी बाजारांना परवानगी देण्यात आली आहे.
तेथे माथाडी कायद्यातील तरतुदीनुसार नोंदीत हमाल, मापाडींकडून काम करून घेण्याचे पणन संचालकांचे आदेश आहेत. तेथे कायद्यातील या तरतुदीची अंमलबजावणी झाली पाहिजे. यासह विविध मागण्यांचा निवेदनामध्ये समावेश आहे.





