Pune : ‘टीचर रूममधील आवाज विधानपरिषदेत जाऊ द्या’

पुणे – “शिक्षणात आमूलाग्र बदल होणार अशी गर्जना झाली होती. परंतु अद्याप तो झालेला नाही. शिक्षणातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांची जाण-अभ्यास असणाऱ्या शिक्षक कार्यकर्त्यांनी विधान परिषद सदस्य म्हणून जाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे टीचर रूममधील आवाज विधानपरिषद भवनात जावू द्या,’ असे आवाहन शिक्षक संघटनेचे ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी केले आहे.
संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थी संख्या, डोनेशन, विना अनुदानित शाळा, ग्रंथालय, प्रयोगशाळा, रात्रशाळा, परीक्षा पद्धत, शालेय इमारती, खेळासाठी मैदाने, लेखनिक, सेवक, अभ्यासक्रम, शिक्षकांसाठी घरकुल योजना, प्रयोगशाळा सेवक, मूकबधीर वर्ग आदींबाबतचे प्रश्न प्रलंबित आहेत. ते प्रश्न सुटले पाहिजेत तरच शिक्षणात आमूलाग्र बदल झाला असे म्हणता येईल.
शिक्षणातील काही प्रश्नांसाठी आयोग, न्यायाधिकरण, केंद्रीय दरांनी महागाई भत्ता यासाठी शिक्षक संघटना व विधानपरिषद सदस्य यांचे फार मोठे योगदान मिळाले आहे. यात ५४ दिवसाचा संप, निदर्शने, उपोषणे यामुळे काही प्रश्न मार्गी लागलेही आहेत, असेही कुलकर्णी यांनी नमूद केले.





