Pune : विमानतळ धावपट्टीवरच बिबट्याचा वावर

पुणे : पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीवर बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. सोमवारी (दि. २८) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास विमानतळाच्या धावपट्टीवर आरामात बसलेल्या बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे विमानतळ अधिकारी, सुरक्षा कर्मचारी यांच्यासह नागरिकांमध्ये घबराट पसरली.
लोहगाव विमानतळाच्या मुख्य रन वे जवळच बिबट्याचे प्रथम दर्शन झाले. वन विभागाला याची खबर मिळताच अधिकारी आणि रेस्क्यू (आरईएसक्यू) टीम घटनास्थळी दाखल झाली. मात्र, मंगळवारी (दि. २९) रात्री उशिरापर्यंत बिबट्याला पकडण्यात पथकाला यश आले नाही. त्याचा शोध सुरू असल्याचे वन विभागातर्फे सांगण्यात आले.
या घटनेने लोहगाव विमानतळावरील अधिकारी, कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोहगावमधील परिसरातही घबराट पसरली आहे. वन विभागाला बिबट्या आढळून आल्याची माहिती मिळताच एक टीम घटनास्थळी रवाना केली आहे. बिबट्याचा शोध सुरू असून, लवकरच बिबट्याला रेस्क्यू करण्यात यश येईल, अशी माहिती वन विभागाचे वन अधिकारी सुरेश वरद यांनी सांगितली.
विमानतळावर बिबट्या असल्याचा फोन आल्यानंतर त्वरित पहिली टीम घटनास्थळी पाठवून देण्यात आली आहे. बिबट्या सदर ठिकाणी असल्याची खात्री झाली असून, आता दुसरी टीमही घटनास्थळी पोहोचली आहे, अशी माहिती रेस्क्यू (आरईएसक्यू) टीम प्रमुख नेहा पंचमिया यांनी दिली. दरम्यान, सोमवारी रात्रीच दोन ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले असून, दोन ट्रॅप पिंजरेही लावण्यात आले आहेत.
मात्र, बिबट्याचे ठिकाण अद्याप सापडले नाही. मंगळवारी श्वानपथकाच्या मदतीने काही ठिकाणे शोधण्यात आली असून, त्या ठिकाणी नवीन कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत. सध्या एकूण सात ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले असून, दोन ठिकाणी ट्रॅप पिंजरे लावण्यात आले आहेत. वन विभाग आणि रेस्क्यू (आरईएसक्यू) टीम संयुक्तपणे देखरेख करत आहेत.




