Pune : लिंबे झाली स्वस्त; कलिंगड, खरबुजाचे दरसुद्धा उतरले

पुणे : लिंबाच्या वाढलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी शेतकरी वर्गाकडून लहान तसेच कच्च्या लिंबाची तोड करून बाजारात व्रिक्रीस पाठविण्यास सुरुवात केली. बाजारात येत असलेल्या लिबांमध्ये अपेक्षित रस नसल्याने तसेच ती कच्ची असल्याने त्याच्या खरेदी करण्याकडे पुणेकरांनी पाठ फिरविली. परिणामी, लिंबाच्या भावात १५ ते २० किलोच्या गोणीमागे दोनशे ते तीनशे रुपयांनी घसरण झाली आहे.
आंब्यामुळे अन्य फळांच्या खरेदीकडे खरेदीदारांनी पाठ फिरविली आहे. परिणामी, या फळांना अपेक्षित मागणी नसल्याचे चित्र आहे. मागील काही दिवस कलिंगड व खरबुजाच्या वाढलेल्या दरात किलोमागे दोन ते तीन रुपयांची घसरण झाली आहे. बाजारातील आवक-जावक कायम असल्याने सर्व प्रकारच्या फळांचे दर गतआठवड्याच्या तुलनेत टिकून असल्याची माहिती व्यापार्यांनी दिली.
गुलटेकडी येथील मार्केट यार्ड फळबाजारात रविवारी (दि. ४) फळबाजारात मोसंबी ३० ते ४० टन, संत्रा २ ते ३ टन, डाळिंब १५ ते २० टन, पपई १० ते १५ टेम्पो, लिंबांची सुमारे १ हजार ५०० ते २ हजार गोणी, कलिंगड २० ते २५ टेम्पो, खरबूज २५ ते ३० टेम्पो, चिकू दोन हजार बॉक्स, पेरू १५० ते २०० क्रेट्स, अननस ६ ट्रक इतकी आवक झाली.
आंब्याला मागणी
रत्नागिरी आणि कर्नाटक हापूसला मागणी वाढली आहे. येथील बाजारात रविवारी (दि. ४) सुमारे ३ हजार पेटींची आवक झाली. घाऊक बाजारात तयार आंब्याला डझनाला ४०० ते ८०० रुपये मोजावे लागत आहे. रत्नागिरी हापूसच्या कच्च्या मालाच्या ४ ते ९ डझनाच्या पेटीला १५०० ते ४ हजार, तर तयार मालाच्या पेटीला २ हजार ते ४ हजार रुपये मोजावे लागत आहेत. कर्नाटक हापूसची आवक वाढली आहे. बाजारात ५ ते ७ हजार पेटींची आणि दोन डझनाच्या २० हजार बॉक्सची आवक झाली. हापूसच्या ३ ते ५ डझनाच्य पेटीला १ हजार ते १६०० रुपये भाव मिळत आहे.





