Pune: स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय हालचालींना वेग आला असून, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पक्षाकडे भक्कम संख्याबळ असल्याने पुणे विधान परिषदेची जागा भाजपलाच मिळावी, अशी मागणी पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रिया २५ मेपासून सुरू होत असून, त्याआधीच पुणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर चर्चा सुरू झाली आहे. भाजपकडे एकूण ३३३ सदस्यांचे भक्कम संख्याबळ – स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडून आलेल्या सदस्यांच्या आकडेवारीनुसार भाजपकडे स्वतःचे ३०९ सदस्य आहेत. याशिवाय दौंड येथील ‘नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी’चे १७ सदस्य तसेच इंदापूरमधील ‘कृष्णा भीमा विकास आघाडी’चे ७ सदस्य भाजपला पाठिंबा देत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भाजपकडे एकूण ३३३ सदस्यांचे भक्कम संख्याबळ असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात जनाधार मिळाला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसारख्या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये पक्षाच्या नगरसेवकांची संख्या लक्षणीय आहे. तसेच स्थानिक आघाड्यांनीही भाजपच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत पाठिंबा दिला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील पुणे विधान परिषदेची जागा भाजपकडेच राहणे अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले. तर बिडकर यांनी पक्षश्रेष्ठींना आपल्या अनुभवाचाही उल्लेख करून उमेदवारीचा विचार करण्याचे आवाहन केले आहे. पुणे महानगरपालिकेत गेली अनेक वर्षे नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली असून, पक्षाने तीन वेळा गटनेता म्हणून जबाबदारी दिली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आणि संघटनात्मक ताकद आपल्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.