Pune : बस वेळेत सोडा, प्रवासी वाढवा

पुणे : वारंवार बस रस्त्यात बंद पडल्यामुळे संचलनातील फेऱ्यांवर परिणाम होत आहे. परिणामी प्रवाशांना बसची वाट पहावी लागते. त्यामुळे सर्व मार्गावरील बसची वारंवारता नियोजित वेळेत सुरू ठेवा, असे आदेश पीएमपीच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांनी सर्व आगार प्रमुखांना दिले आहेत.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरएडीच्या हद्दीत प्रवासी सेवा देण्यात येते. नुकतेच पीएमपीने तिकीट दर वाढविले आहे. त्यामुळे उत्पन्नदेखील वाढत आहे.
परिणामी प्रवाशांची संख्या कमी होऊ नये, यासाठी दक्षता घेण्यात यावी. बस मार्गावर सोडताना देखभाल दुरुस्ती करून सोडावी. प्रवासी संख्या वाढविण्यावर भर देण्यात यावा. ब्रेकडाउनचे प्रमाण कमी करावे.
तसेच जून महिन्यात प्रवासी संख्या १० लाखांवरून जवळपास १४ ते १५ लाख वाढविण्यावर भर देण्यात यावा. मार्गावरील बसचे योग्य नियोजनही करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.





