pune : वांगचुक यांच्या समर्थनार्थ वकिलांचे आंदोलन
Pune:

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
पुणे – संविधान रक्षक वकील फोरम, पुणे यांच्या वतीने शिवाजीनगर न्यायालय परिसरात सामाजिक कार्यकर्ते सोमन वांगचुक यांच्या समर्थनार्थ, तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनामध्ये शंभरहून अधिक वकिलांनी सहभाग घेऊन केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी केली. शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या वांगचुक यांच्याशी संवाद न साधता ताब्यात घेतल्याचा आंदोलकांनी निषेध केला.
लोकशाहीमध्ये मत व्यक्त करण्याचा आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत व घटनात्मक अधिकार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.
या वेळी ॲड. तोसिफ शेख म्हणाले, की वांगचुक यांना कोणतीही चर्चा न करता पोलिसांनी ताब्यात घेतले, ही घटना भारतीय लोकशाही आणि संविधानावर झालेला गंभीर आघात आहे.
सरकारने लोकशाहीच्या गळ्याला हात घालण्याचा प्रयत्न केला आहे. संविधानिक मूल्यांची हत्या करण्याच्या प्रकाराचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. या आंदोलनात ॲड. मोहन वडेकर, ॲड. शाहीद अख्तर यांच्यासह अनेक वकील व संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





