लोणावळा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी सुहास जगताप

लोणावळा, (वार्ताहर) – लोणावळा शहर पोलीस ठाण्यामधील दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी पुणे ग्रामीण वाहतूक शाखेमध्ये कार्यरत असलेले सुहास लक्ष्मण जगताप यांची नियुक्ती झाली. लोणावळ्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी सुहास जगताप यांनी पदभार स्वीकारला.
सुहास जगताप हे १९९५ मध्ये महाराष्ट्र पोलिस दलात भरती झाले. त्यांनी यापूर्वी मुंबई, सीआयडी क्राईम ब्रॅन्च, सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण वाहतूक शाखा आदी ठिकाणी सेवा बजावली आहे. त्यांच्या सेवा काळामध्ये त्यांनी अनेक धडाकेबाज कारवाया केल्या आहेत.
पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांचा निरोप समारंभ व पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांचा स्वागत समारंभ गुरुवारी सायंकाळी झाला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, मावळ वार्ता फाउंडेशनचे अध्यक्ष नासिर शेख, माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव, मनसेचे लोणावळा शहराध्यक्ष भारत चिकणे, माजी शिक्षण मंडळ सभापती जितेंद्र कल्याणजी, पोलीस उपनिरीक्षक रोहन पाटील यांच्यासह लोणावळा शहरातील विविध मान्यवर व लोणावळा शहर पोलीस ठाण्यामधील अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुहास जगताप म्हणाले की, लोणावळा शहरातील वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. लोणावळेकर नागरिकांच्या मदतीने ही समस्या सोडवण्यावर भर दिला जाणार आहे.





