पुणे जमीन घोटाळा प्रकरण: मुख्य आरोपी शीतल तेजवानीला अखेर बेड्या

पुणे: मुंढवा येथील तब्बल ४० एकर जमीन घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य आरोपी शीतल तेजवानी हिला अटक केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी ही वादग्रस्त जमीन खरेदी करण्यात आली होती.
घोटाळ्याचा तपास गतिमान झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून शीतल तेजवानीची यापूर्वी दोन वेळा कसून चौकशी केली होती. चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून तिचा थेट सहभाग स्पष्ट झाल्याने अखेर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
हायकोर्टात धाव, पण उपयोग नाही –
याप्रकरणी दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी शीतल तेजवानीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणीही झाली. मीडिया रिपोर्ट्समुळे आपणास लक्ष्य केले जात असल्याचा दावा तेजवानीने याचिकेत केला होता.
मीडिया रिपोर्टवर गुन्हा दाखल केला असून माध्यमांमध्ये ‘फरार’ घोषित करण्यात आल्याचा आरोपही तिने याचिकेत केला. मात्र, दुसऱ्या जमिनीच्या प्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन झाली असून तेजवानीची उपस्थिती आवश्यक असल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला होता.
१८०० कोटींची जमीन केवळ ३०० कोटींमध्ये?
पुण्यातील मुंढवा येथील सुमारे १८०० कोटी रुपये किंमतीची जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने केवळ ३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, यासाठी स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ ५०० रुपये दिले होते. पार्थ पवारांनी कोरेगाव पार्कमध्ये आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारी चालवली होती.
एक लाख रुपयांचे भांडवल असलेल्या कंपनीला हा एवढा मोठा व्यवहार कसा शक्य झाला, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता. उद्योग संचालनालयाने अवघ्या ४८ तासांत स्टॅम्प ड्युटी माफ केली, तर केवळ २७ दिवसांत हा व्यवहार पूर्ण झाला.
हे प्रकरण माध्यमांमध्ये गाजल्यानंतर संबंधित जमीन व्यवहार रद्द करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः माध्यमांसमोर येऊन दिली होती. या प्रकरणावरून राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
दोन ठिकाणी गुन्हे दाखल –
मुंढवा जमीन गैरव्यवहाराबद्दल आधी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या बावधन पोलीस ठाण्यात दिग्वीजय पाटील, शीतल तेजवानी आणि रविंद्र तारू यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर, पुणे पोलिसांनी देखील या प्रकरणाचा तपास हाती घेत नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता, या प्रकरणातील मुख्य आरोपी शीतल तेजवानीला अटक करण्यात आल्याने तपासाला आणखी गती मिळण्याची शक्यता आहे.




