Pune News: कोयता गँगचा धुमाकूळ, गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न

पुणे: शहरात सातत्याने कोयता गँगद्वारे हल्ला, गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याच्या घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच सिंहगड रोडवरील सोसायटीत घुसून गुडांनी एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आता लोहगाव येथील साठे वस्तीमध्ये असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.
लोहगाव येथील साठे वस्तीमध्ये तरूणांनी कोयता व दगडांचा वापर करून गोड्यांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हीडिओमध्ये हे तरूण सर्रासपणे परिसरात कोयता घेऊन फिरत असल्याचे दिसत आहे.
दोन तरूणांनी कोयता, दगडांचा वापर करून परिसरातील गाड्या, दुकानांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रकार केला आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून देखील तत्परता दाखवत घटनेतील आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सिंहगड रोडवरील कोल्हेवाडी भागात देखील अशाच प्रकारची घटना घडली होती. काही तरूणांनी कोयत्याचा धाक दाखवत एका तरूणावर हल्ला केला होता.





