पुणे : कोथरूड-बावधन ‘आघाडी’च्या पथ्थ्यावर

इच्छुक उमेदवारांची मात्र पंचाईत; संभ्रमावस्था
कोथरूड – प्रभाग तोडल्यामुळे कोथरूड-बावधनमधील काही विद्यमान उमेदवारांसमोर कोणत्या प्रभागातून निवडणुक लढवायची ही संभ्रमावस्था होती. त्यात आरक्षणही मनासारखे पडले नाही. त्यामुळे विद्यमान उमेदवारांची पंचायत झाली आहे. मात्र, हे आरक्षण राष्ट्रवादी, कॉग्रेस आणि शिवसेनेच्या पथ्थ्यावर पडणारे आहे.
कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पूर्वी चारचे तीन प्रभाग होते. त्यामध्ये एकूण 12 नगरसेवकांपैकी 8 नगरसेवक भाजपचे, कॉग्रेसचे 2 तर शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रत्येकी दोन नगरसेवक होते. एकूण प्रभागात 6 पुरूष आणि 6 महिला होत्या. मात्र, यंदा तीनची प्रभाग रचना आणि आरक्षण यामुळे भाजपच्या उमेदवारांची पंचायत झाली आहे. प्रभाग 30, 31 आणि 33 मध्ये सर्वसाधारण महिला आणि दोन सर्वसाधारण म्हणजेच एक महिला आणि दोन पुरूष असे आरक्षण पडले आहे.
त्यामध्ये प्रभाग 30 मध्ये कॉग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद अधिक असून, आरक्षणही सर्वसाधारण पडल्यामुळे दोन्ही पक्षाला परिस्थिती अनुकूल आहे. प्रभाग 31 मध्ये शिवसेना आणि भाजपचे वर्चस्व आहे. खुद्द माजी महापौरांचा असलेला प्रभाग तोडण्यात आला असून, त्यांचा बहुतांश भाग प्रभाग 33 चा जोडण्यात आला आहे. त्यामुळे माजी महापौर प्रभाग 33 मध्ये इच्छुक असल्यामुळे प्रभाग 31 मध्ये पुरूष गटातून उमेदवार कोण? असा प्रश्न उपस्थित होतो.
तर शिवसेनाला या प्रभागात वर्चस्व मिळविण्याची पुन्हा संधी आली आहे. प्रभाग 33 हा नव्याने जोडला असून, याठिकाणी भाजपची ताकद दिसून येते. त्याचबरोबर अन्य पक्षाकडून कोण उमेदवार रिंगणात असणार, एनवेळी उडी कोण मारणार यावर पुढील रणनिती स्पष्ट होईल.
कोणत्या प्रभागातून…
नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये बावधन बुद्रुकचा समावेश आहे. त्यामुळे यंदाच्या प्रभाग रचनेत जुना प्रभाग 10 चा काही नव्याने तयार केलेल्या पाषाण-बावधन बुद्रुक या प्रभाग 14 ला जोडण्यात आला आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांसमोर आता निवडणूक कोणत्या प्रभागातून लढवायची, हा प्रश्न पडला. त्यात आरक्षण महिलाऐवजी पुरूष पडल्यावर काहीतरी चांगली संधी मिळेल, यासाठी काहींनी देवाला साकडे घातले. मात्र, आजच्या आरक्षण सोडतीमध्ये प्रभाग 32 मध्ये दोन महिला आणि एक पुरूष तर प्रभाग 14 मध्ये 1 अनुसुचित जमाती, एक महिला आणि सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झाले. त्यामुळे पुरूष गटातील दोन विद्यमानांसमोर कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवायची असा प्रश्न पडला. एकाला माघार घेऊन महिला उमेदवाराला संधी द्यावी लागणार? त्यामध्ये पक्ष कोणाला संधी देणार. परंतू, हा प्रभाग राष्ट्रवादीसाठी आता अनुकुल ठरत असल्याचे दिसून येते.




