पुणे: व्यावसायिक दृष्टीकोन ठेवा, डिजिटल तंत्रज्ञान वापरा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सल्ला : उत्कृष्ट नागरी बॅंकांच्या सत्कार समारंभ
पुणे – स्पर्धेच्या युगात नागरी सहकारी बॅंकांसमोर अनेक अडचणी असल्या तरी ग्राहकांचा विश्वास मिळवीत प्रगती साधता येईल. सहकारी संस्था ग्राहकाभिमुख आणि लोकाभिमुख व्हायला हव्यात. ग्राहकांना सेवा देताना व्यावसायिक दृष्टीकोन ठेऊन नव्या डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. बॅंकांच्या प्रशासनात पारदर्शकता आणून अधिक चांगली सेवा देण्यावर भर द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनच्या “राज्य शिखर प्रशिक्षण केंद्र’ उद्घाटन आणि उत्कृष्ट नागरी बॅंकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष मोहिते, उपाध्यक्ष साहेबराव टकले, मानद सचिव संगीता कांकरिया आणि संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते. यावेळी विद्याधर अनास्कर यांची महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नागरी सहकारी बॅंकांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
पवार म्हणाले, “नागरी सहकारी बॅंकांसमोर अनेक आव्हाने असली तरी त्यावर मात करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. प्रशिक्षणामुळे बॅंकांना दैनंदिन कामकाजात चांगला फायदा होईल. सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा विश्वास टिकेल अशी कामगिरी करण्यावर भर द्यावा. मावळ तालुक्यातील नियोजित प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीसाठी शासकीय जागा देण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल.’
सहकाराला 110 वर्षांपेक्षा अधिकची परंपरा आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासात सहकाराचे मोठे योगदान आहे. नागरी सहकारी बॅंक असोसिएशनच्या माध्यमातून प्रशिक्षणाचे चांगले काम होत आहे. संगणकीय प्रणाली अस्तित्वात आल्यानंतर प्रशिक्षण महत्वाचे झाले आहे. भविष्यात येणाऱ्या अडचणींविषयीदेखील प्रशिक्षण केंद्राद्वारे मार्गदर्शन होईल.
– बाळासाहेब पाटील, सहकार व पणन मंत्री





