Pune : कात्रज-कोंढवा रस्ता ; आणखी एक वर्ष त्रास

कात्रज – कात्रज-कोंढवा रस्ता रूंदीकरण कामात भूसंपादनाचा मोठा अडथळा पार करताना प्रशासनाची मोठी दमछाक होत आहे. याच कारणातून पाहिल्या टप्प्यातील काम रेंगाळत सुरू आहे. यापार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या कामासाठी भूसंपादन करणे गरजेचे आहे.
कारण, पहिल्या टप्प्यातच जागा ताब्यात घेण्यास दोन ते अडीच वर्षांचा कालावधी गेला आहे. त्यामुळे चौकात सुरू असलेले ग्रेडसेपरेटरचे काम पूर्ण झाले तरी पुढील टप्प्यातील भूसंपादनाशिवाय वाहतूक सुरळीत होणार नाही. कारण, ग्रेडसेपरेटरच्या परिसरात सेवा रस्ते आणि इतर कामांसाठी भूसंपादन आवश्यक आहे. याकरीता किमान पुढील वर्षभराचाही कालावधी लागू शकतो.
कात्रज-कोंढवा रस्त्याच्या पहिल्या टप्प्यात राजस सोसायटी चौक ते इस्कॉन मंदिर चौक आणि दुसऱ्या टप्प्यात इस्कॉन मंदिर चौक ते खडीमशीन चौक रस्त्याचे रुंदीकरणाचे काम होत आहे. पाहिल्या टप्प्यातील कामासाठी भूसंपादन प्रक्रिया अतिशय वेळ खाऊ ठरली आहे.
महापालिकेकडून ४७० कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले त्यानंतर महापालिकेला राज्य सरकारकडून १३८ कोटींचा निधी मिळाल्यानंतरही भूसंपादनास वर्षभराचा कालावधी गेला आहे. तरीही हे काम पूर्ण झालेले नाही. पहिल्या टप्प्यातील भूसंपादन पूर्ण झाल्यानंतरही रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू करण्यासाठी पथविभागाला आणखी काही महिने लागतील. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील कामास उशीर होणार हे नक्की मानले जात आहे.
‘कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रूंदीकरणाच्या पहिल्या टप्प्यात भूसंपादनाच्या नोटिफिकेशनसाठी मान्यता मिळालेली आहे. याबाबतच्या नोटीसा पुढील दोन आठवड्यात दिल्या जातील, त्यानुसार पहिल्या टप्प्यातील भूसंपादन प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील भूसंपादनाचे काम सुरू करणार आहोत. त्यात अडचण येणार नाहीत.’ – श्वेता दारुणकर, मुख्य भूसंपादन अधिकारी.





