Pune : कर्नाटक बसला फासले काळे

पुणे : कर्नाटकातील बस थांब्यावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चालकाला मारहाण प्रकरणाचे पडसाद पुण्यात उमटले. पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकरणाचा निषेध करत स्वारगेट येथील लक्ष्मी नारायण टाॅकीज चौकातील कर्नाटक राज्याच्या बसला काळे फासून कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
या वेळी शिवसैनिक स्वारगेट बस स्थानकात घुसताच कर्नाटक बसचे ड्रायव्हर घाबरून पळून गेले आणि शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान, या आंदोलनाची कल्पना पोलिसांना असल्यामुळे परिसरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.
मात्र, शिवसैनिकांनी सुरुवातीला लक्ष्मीनारायण टाॅकीज चौकातील कर्नाटक सरकारच्या गाड्यांना काळे फासले. त्यानंतर मोर्चा स्वारगेट बसस्थानकाकडे वळविला. सरकारने सीमा प्रश्न सोडवावा, सरकारचा धिक्कार असो, मराठी माणसावर अन्याय झालेला खपवून घेतला जाणार नाही, एसटी चालकाला झालेली मारहाण खपवून घेतली जाणार नाही, आम्हीही रस्त्यावर उतरू, असे या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. याप्रसंगी कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील पाटील घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतल्यावर तणाव निवळला. या आंदोलनात शिवसेना विभागप्रमुख सूरज लोखंडे, युवासेना अधिकारी राम थरकुडे, समन्वयक युवराज पारीख, परेश खांडके, हर्षद ठकार, मकरंद पेठकर, अनिल दामजी, गिरीश गायकवाड, सौरभ ढेबे, गणेश घोलप, जुबेर तांबोळी, समीर खान, पंकज परदेशी सहभागी झाले होते.





