पुणे : काळेपडळचा पाणी प्रश्न सुटणार; लवकरच मिळणार मुबलक पाणी

* सेलेना पार्क येथील टाकीचे काम पुर्ण ; नगरसेवक भानगिरे यांचा दावा
हडपसर : सेलेना पार्क येथील पाणी साठवणूक टाकीचे काम शंभर टक्के पूर्ण झाल्याचा दावा नगरसेवक नाना भानगिरे यांनी केला असून, पाण्याच्या नवीन लाईन यांचे काम अंतिम टप्प्यात आहे.
काम एका ठिकाणी काही नागरिकांना मोबदला मिळवा यासाठी रखडले होते,मात्र त्या नागरिकांना लेखी स्वरूपात मोबदला देण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच काळेपडळ, हांडेवाडी रोड परिसरातील नागरिकांना मुबलक व पुरेशे पाणी मिळेल, अशी माहिती नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी दिली.
प्रभाग क्रमांक २६ महंमदवाडी – कौसरबाग मधील काळेपडळ, चिंतामणीनगर, सातवनगर, हांडेवाडी रोड मधील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून भेडसावत होता. तेव्हा नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक लहान मोठी आंदोलने नागरिकांनी क्षेत्रिय कार्यालय, लष्कर पाणीपुरवठा जलकेंद्र, महापालिका मुख्य इमारत आणि आयुक्तांच्या दालनात केली.त्यास आता पूर्णेपणे यश येताना दिसत आहे.
‘गेली अनेक वर्ष या भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ही टंचाई दूर करण्यासाठी सेलेना पार्क येथील पाण्याच्या टाकीचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. पाण्याच्या टाकीतून पाणी टेस्टिंगही करण्यात आली आहे. मोबदल्यासाठी एका ठिकाणी लाईनचे काम रखडले होते .त्यांना लेखी स्वरूपात मोबदला देण्यात आला असल्याने लाईनचे काम पूर्ण होवून नागरिकांना लवकरच या टाकीतून पाणी मिळेल.’
– प्रमोदनाना भानगिरे (नगरसेवक)





