Pune : जेईई मेनच्या पेपर एक परीक्षेचा निकाल जाहीर

पुणे : देशातील अभियांत्रिकी प्रवेशासाठी अनिवार्य असलेले जेईई मेनच्या पेपर एक परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या परीक्षेत देशातील १४ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळविले आहेत. यात महाराष्ट्रातील विशाद जैन या विद्यार्थ्याचा समावेश आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे ही परीक्षा देशभरात घेण्यात आली. त्याचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला. जेईई मेनच्या पेपर एक परीक्षेसाठी एकूण १३ लाख ११ हजार ५४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
यापैकी १२ लाख ५८ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पेपर एकची परीक्षा २२ ते २९ जानेवारी या कालावधीत एकूण ३०४ शहरांमधील ६१८ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. यासोबतच जेईई पेपर दोनचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
आयुष सिंघल (राजस्थान), कुशाग्र गुप्त (कर्नाटक), दक्ष (दिल्ली), हर्ष झा (दिल्ली), रजित गुप्ता (राजस्थान), श्रेयस लोहिया (उत्तर प्रदेश), सक्षम जिंदाल (राजस्थान), सौरव (उत्तर प्रदेश), विशाद जैन (महाराष्ट्र), अर्णव सिंग (राजस्थान), शिवेन विकास तोष्णीवाल (गुजरात), साई मनोगाना गुठीकोंडा (आंध्र प्रदेश), ओम प्रकाश बेहरा (राजस्थान), बानी ब्रता माझी (तेलंगणा) या विद्यार्थ्यांनी जेईई मेन परीक्षेत 100 टक्के गुण पटकावले आहेत. सविस्तर माहिती एनटीएच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.




