Pune : अर्ध्या तासात उरकला जनता दरबार!

पुणे : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनता दरबार विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित केला होता. त्यासाठी त्यांनी दोन तासांचा वेळ दिला होता. मात्र, अर्ध्या तासातच हा दरबार उरकण्यात आला. येथे सामान्य नागरिकांपेक्षा कार्यकर्त्यांचीच गर्दी पहायला मिळाली.
विधानभवन येथे दुपारी २ ते ४ या वेळेत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महसूल कर्मचारी संघटना, ग्राम महसूल अधिकारी संघटना, कोतवाल संघटनेचे पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते. प्रत्यक्षात बावनकुळे यांच्या दरबारात पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच मोठी गर्दी केली.
प्रशासनाकडून या संदर्भात माहिती घेतल्यानंतर केवळ चाळीस नागरिक समस्या घेऊन आले असल्याची माहिती समोर आली. नागरिकांनी दिलेल्या निवेदनावर बावनकुळे यांनी शेरे लिहून संबंधित विभागाकडे तत्काळ हस्तांतरित करीत कार्यकर्त्यांना वेळ दिला.
नुकसान भरपाईच्या रकमा, शासकीय जमिनी भोगवटा वर्ग-१ करणे, आधार कार्ड, जळीत प्रकरणी नुकसान भरपाई अदा करणे, पानशेत पूरग्रस्तांचे पुनर्वसन, गुहागर रत्नागिरी लाइट हाऊस टुरिझम आदी विषयांवर नागरिकांकडून तक्रारी करण्यात आल्या. तर महसूल कर्मचारी संघटनेकडून महसूल विभागाचा आकृतिबंध अद्ययावत करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले.





