Pune : भरपावसात जगन्नाथ रथयात्रा जल्लोषात

पुणे – पावसाची संततधार अन् भाविकांच्या मोठ्या उत्साहात श्री श्री जगन्नाथ रथयात्रा सोहळा उत्साहाने साजरा झाला. हरे राम, हरे कृष्णा, जय जगन्नाथ, जय बलराम, जय सुभद्राच्या अखंड जयघोषात भक्त तल्लिन झाले होते.
ओडिशामधील जगन्नाथ पुरीतील रथयात्रेच्या धर्तीवर पुण्यातील आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघातर्फे आयोजित केलेल्या रथयात्रेत हजारो भाविक पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. यात्रा मार्गावर १ लाख भाविकांना प्रसादाची पाकिटे वाटली.
इस्कॉनच्या रथयात्रेला स.प.महाविद्यालय येथून प्रारंभ झाला. पुष्पवृष्टी करत पुणेकरांनी यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत केले. कात्रज-कोंढवा रस्ता येथील इस्कॉन मंदिरातील भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्ती दर्शनासाठी रथावर ठेवल्या होत्या. २० फूट उंचीच्या रथावर फुलांसह रंगीबेरंगी कापडांनी सजावट केली होती.
इस्कॉन संस्थेचे संन्यासी परम पूज्य लोकनाथ स्वामी, इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे, आमदार हेमंत रासने, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, सुनील कांबळे यांच्यासह नगरसेवक, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रथयात्रा सुरू झाली. भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांची आरती करून यात्रेला प्रारंभ झाला.
यावेळी इस्कॉन मंदिराचे उपाध्यक्ष संजय भोसले, मंदिराचे प्रवक्ते जनार्दन चितोडे, रथ यात्रेचे समन्वयक अनंतगोप प्रभू, जनसंपर्क प्रमुख प्रसाद कारखानीस आदी उपस्थित होते. केरळमधील प्रसिद्ध थैय्यम लोककला, संस्कृतीवर आधारित महाविष्णू, नृसिंह सरस्वती आदी देवतांच्या रूपातील कलाकारांचे नृत्य रथ यात्रेचे मुख्य आकर्षण होते.
यात्रा मार्गावरील रांगोळ्यांच्या गालिच्यावरून भाविक रथ ओढत होते. विशेष म्हणजे यात्रा पुढे गेल्यावर स्वयंसेवक तातडीने प्लॅस्टिकच्या बाटल्या, कागदी कप आदी कचरा गोळा करत होते. समारोपानंतर भगवंतांना ५६ भोगांचा नैवेद्य अर्पण करून आरती झाली. जवळपास २० हजार भाविकांना प्रसादाचे वाटप झाले.





