Pune : बरे झाले पक्ष फुटला; असल्या माणसांबरोबर राहूच शकले नसते

पुणे : बरे झाले पक्ष फुटला. जी व्यक्ती आपल्या दोन मुलांची आई असलेल्या स्वत:च्या बायकोच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो, अशा पुरुषाबरोबर मी पक्षात काम करणार नाही. असे करणारा खरे तर पुरुषच असू शकत नाही, अशा शब्दात धनंजय मुंडे यांचे नाव न घेता खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी जोरदार टीका केली. राज्यातील महायुतीच्या कारभारावर टीका करताना शंभर दिवसात एक विकेट गेली आहे. सहा महिने थांबा आणखी एक विकेट जाणार आहे, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. एकवेळ मी विरोधात बसेन, परंतु मी नैतिकता सोडणार नाही, असे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आढावा बैठकीत त्यांनी पक्षातील अनेक गौप्यस्फोट केले. यावेळी पुण्याचे प्रभारी आणि आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या, ते जर या पक्षात असते तर मी या पक्षात नसते, त्यामुळे बरे झाले पक्ष फुटला. त्यांनी केलेल्या या प्रकारानंतरच खरी लढाई सुरू झाली. यावर मी आज पहिल्यांदा बोलले आहे. मला नको ते ठेकेदारांचे पैसे. त्यावर माझे घर चालत नाही. बीड येथील संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या घरी एकदा तरी जाऊन या. तुम्हाला कळेल, काय परिस्थिती आहे.
मला मिळालेल्या माहितीनुसार आणखी एक रिपोर्ट बाहेर आला आहे. त्यामध्ये देशमुख यांना मारहाण होत असताना त्यांना फोन आले होते. त्यावेळी हे या सर्व प्रकाराची गंमत बघत होते, किती ही विकृती आहे. हे वास्तव आहे. अवादा कंपनीला काम देऊ नये, म्हणून एका गृहस्थाने केंद्र सरकारला तीन पत्र दिली आहेत. पत्रही यांनीच द्यायची, खंडणीही यांनीच गोळा करायची, हा हक्काचा एक्का तोच आहे, असा आरोप सुळे यांनी केला.
मतदारांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. हार-जीत सुरूच असते. सहा महिने थांबा, आणखी एकाची विकेट जाणार आहे. त्यांचे नाव आताच जाहीर करणे योग्य नाही. परंतु जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो. हिंमत असेल, तर समोर येऊ लढ. ही लढाई खूप मोठी आहे. छोट्यांना घेरण्यापेक्षा जे ‘डबल डेंजर’ आहेत, त्यांच्याशी लढण्यात मजा आहे, असे म्हणत खा. सुळे यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर टीका करत त्यांना आव्हान दिले.





