Pune : ठाकरे बंधु एकत्र आले तर आनंदच

पुणे : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघे एकत्र येत आहेत, ही अतिशय आनंदाची बातमी आहे. मी या दोघांनाही संपर्क केला. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघे एकत्र येत असतील तर राजकीय आणि कौटुंबिक, इतिहासातला सोनेरी दिवस आहे. तसेच, ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत असतील तर आपण त्यांचे स्वागत केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
खासदार सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, आमचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे सहा दशकांचे कौटुंबिक संबंध आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आमच्या कुटुंबासाठी आजही प्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरे आज हा दिवस बघण्यासाठी असते तर आम्हाला खूप आनंद झाला असता.
नवीन शिक्षण धोरण चुकीचे…
शिक्षणात हिंदी भाषेच्या सक्तीवर खासदार सुळे म्हणाल्या की, नवीन शिक्षण धोरण हे चुकीचे आहे. मुलांचे प्रचंड नुकसान होईल. शिक्षकांचीही तयारी झालेली नाही. सीबीएसई बोर्ड लागू करण्यापेक्षा महाराष्ट्र राज्य बोर्ड सुधारण्याची गरज आहे. सीबीएसई लागू केल्यावर महाराष्ट्र बोर्डाचे काय होणार, हा मूळ मुद्दा आहे. म्हणजे मराठी भाषेचा तर मुद्दा आहेच. नवे शिक्षण धोरण ज्या पद्धतीने महाराष्ट्रात येत आहे. त्याच्यात मराठी भाषेचे नुकसान होणार असेल, तर ते आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही सुळे यांनी दिला.




