Pune : प्रामाणिकतेने चित्रपट घडविणे आवश्यक

पुणे : आदिवासी चित्रपटांच्या माध्यमातून केलेली मांडणी ही सत्यावर आधारित नसते, तर त्याला काल्पनिकतेची जोड देऊन कलात्मक निर्मितीवर भर दिला जातो. विषयाच्या खोलवर जाऊन प्रामाणिकतेने चित्रपट घडविणे आवश्यक आहे. चित्रपटाच्या दिमाखात सत्य, मूळ कथा मारली जाते, त्याचा आत्मा विसरला जातो, अशी खंत गंभीर टिप्पणी नाट्य-चित्रपट पटकथा लेखक आणि अभ्यासक श्रीनिवास भणगे यांनी व्यक्त केली. जैत रे जैत हा चित्रपट खरोखरच आदिवासींच्या रुढी, परंपरा दर्शवणारा आहे का, असा प्रश्न प्रेक्षकांना कधी पडला आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
बहुरंग, पुणेतर्फे पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी सिनेमावर बोलू काही.. या विषयावरील विशेष परिसंवादात भणगे अध्यक्षपदावरून बोलत होते. परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार राज काझी, नाट्य -चित्रपट परीक्षक उमेश घळसासी, सिनेमॅटोग्राफर स्वप्ना पाटसकर, हेमंत भागवत, अभिनेत्री पल्लवी कदम यांचा यांचा सहभाग होता. बहुरंग, पुणेचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक केदारी मंचावर होते. गायक दयानंद घोटकर यांचा या वेळी बहुरंग पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
प्रेक्षकांना आदिवासी समाजाविषयी आत्मियता असल्यास त्या समाजाचा आत्मा, चालिरीती, रुढी-परंपरा दर्शविणारा चित्रपट नक्कीच भावेल. साहित्यकृती, चित्रपट, नाट्यकृती या सर्वांना एक आत्मा आहे, त्याचा शोध घेणे आवश्यक आहे. प्रेक्षक म्हणून आपण आपल्याला काय बघायचे आहे, याविषयी बोलत नाही, तर जे दाखविले जाते त्यातील काय आवडले एवढेच बघतो, असेही भणगे म्हणाले.
काझी, घळसासी, भागवत, पाटसकर, कदम यांचीही भाषणे झाली. केदारी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन श्रीकृष्ण देशमुख यांनी केले. आभार विश्वास रांजणे यांनी मानले.





