Pune: ‘रिक्षावाले काकां’नो स्कूल वाहन सुरक्षित आहे ना?

पुणे – ‘रिक्षावाले काकां’नो तुम्ही ज्या वाहनांमधून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करीत आहात, ते वाहन खरचं सुरक्षित आहे ना? आरटीओकडून त्याची फिटनेस तपासणी, त्याचे योग्यता प्रमाणपत्र घेतले का? नसेल तर थांबा. धोकादायक वाहने रस्त्यावर आणू नका. तत्काळ आपल्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र अद्ययावत करून घ्या, असे आवाहन पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
शहरात आरटीओकडे नोंद असलेल्या स्कूल व्हॅन व बसची संख्या जवळपास सहा हजार ८९५ इतकी आहे. या सर्व स्कूल व्हॅन व बसमधून दिवसाला साधारण चार लाखांच्या पुढे विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. प्रत्येक वर्षी स्कूल व्हॅनला स्कूल बस नियमावलीनुसार योग्यता प्रमाणपत्राचे नुतणीकरण करुन घ्यावे लागते. नुतणीकरण करुन न घेणाऱ्या स्कूल बस व्हॅनवर आरटीओकडून कारवाई केली जाते.
नवीन शैक्षणिक वर्षे 15 जूनपासून सुरू झाले. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात सर्वच रस्त्यावर स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. या शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक होण्याच्या दृष्टीने संबधित बस, व्हॅनचे योग्यता प्रमाणपत्र अद्ययावत असणे आवश्यक आहे. तरी सर्व शाळा, महाविद्यालय व्यवस्थापन तसेच खासगी स्कूल बस मालकांनी तत्काळ आपल्या वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र तातडीने नुतनीकरण करून घ्यावे, यासाठी पुणे आरटीओकडून विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
शालेय बस किंवा व्हॅन या वाहनांना योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण तपासणीसाठी अपॉइंटमेंट घेण्याची आवश्यकता नाही. या वाहनांनी शुल्क भरणा करून दिवे किंवा आळंदी रस्ता कार्यालययात तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र घेऊ शकतात. तसेच रविवारी (दि. 23) सुट्टीच्या दिवशीही नुतनीकरणाचे काम सुरू आहे. त्याबाबत कोणतीही अडचण असल्यास उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, संगम ब्रिज याठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे.





