पुणेच भारी! करोनामुक्तीत शहराचा दर 63.77%

मृत्यूदरही 3 टक्क्यांखाली
पुणे – शहरात करोनाबाधितांचा आकडा आता रोज दोन हजारांच्या घरात पोहोचला असला, तरी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहरात करोनामुक्तांचा टक्का 63.77 वर गेला आहे. हा दर राज्यात 55.63, तर देशात 63.30 टक्के आहे. तर मृत्यूदरही पहिल्यांदाच 3 टक्क्यांखाली आला आहे.
शहरात जुलैच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात नव्याने करोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. दररोज घेण्यात येणाऱ्या चाचण्यांच्या तुलनेत सुमारे 18 ते 20 टक्के बाधित सापडत होते. मागील आठवड्यात हा आकडा 28 टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे दिवसाला सुमारे 1,500 हून अधिक बाधितांची रोज भर पडत आहे. मात्र, त्यातील जवळपास 85 टक्क्यांपेक्षा अधिक बाधित लक्षणे नसलेले, तर साडेचार टक्के बाधितांना लक्षणे दिसत ते गंभीर होत आहेत.
मात्र, त्यानंतरही वेळेत मिळालेले उपचार आणि त्यांना तातडीने वेगळे केले जात असल्याने करोनावर मात करणाऱ्यांचा आकडा वाढला आहे. शहरात आतापर्यंत 2,532 जणांना अतिसौम्य लक्षणे असल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. दरम्यान, देशाचा मृत्यूदर 2.55, तर पुण्याचा मृत्यूदर 2.84 टक्के आहे.
चाचण्यांचे प्रमाणही देशात सर्वाधिक
देशात प्रतिदहा लाख व्यक्तींमागे सर्वाधिक चाचण्यांचे प्रमाण पुण्यात असल्याचा दावा केला जात आहे. पुणे शहरात प्रतिलाख व्यक्तींमागे 4,170 जणांच्या चाचण्या होत असून, दहा लाख व्यक्तींमागे हे प्रमाण 41 हजार 703 आहे. तर, पुण्यात आतापर्यंत तब्बल 1 लाख 84 हजार 697 चाचण्या करण्यात आल्या आहेत.





