Pune : पुणे गारठले, पारा दहा अंशांखाली

पुणे : शहरासह जिल्ह्यातील काही भागांत किमान तापमान पुन्हा १० अंशांखाली आले आहे. शनिवारी (दि. १४) पहाटे एनडीए परिसरात नीचांकी ८.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर हवेली, माळीण, दौंड आणि शिवाजीनगर परिसरातील किमान तापमान दहा अंशांखाली नोंदवले गेले.
अवकाळी पावसामुळे शहरासह जिल्ह्यातील किमान तापमान २१, तर कमाल तापमान ३५ अंशांपुढे गेले होते. त्यामुळे आठवडाभर पडलेली कडाक्याची थंडी गायब झाली. मागील चार दिवसांपासून हवामानातील बदल आणि निरभ्र आकाश यामुळे किमान तापमानात झपाट्याने घट झाली आणि पारा ११ अंशापर्यंत खाली आला. मात्र, गेल्या २४ तासांत पारा दोन ते तीन अंशांनी घटला.
पुढील दोन दिवस थंडीचा जोर कायम राहील. आकाश निरभ्र तर सकाळी हलकेसे धुके पडेल. दि. १५ डिसेंबरनंतर शहरातील किमान तापमानात एक ते दोन अंशाने वाढ होईल. तर दुपारनंतर आकाश ढगाळ राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
शहरासह जिल्ह्यातील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
एनडीए – ८.८, हवेली- ९.३, माळीण- ९.७, दौंड – १०, शिवाजीनगर आणि बारामती – १०.१, आंबेगाव- १०.८, राजगुरूनगर – ११.१, पुरंदर- ११.५, लवासा- १२.३, कोरेगांव पार्क- १५.४, वडगावशेरी- १६.७.





