पुणे – कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका बलात्काराच्या प्रकरणात धक्कादायक वळण आले आहे. तपासादरम्यान तक्रारदार तरुणीने खोटी माहिती दिल्याचे स्पष्ट झाल्याने, आता तिच्याच विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी सरकारतर्फे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, दोन जुलै रोजी एका तरुणीने तक्रार दिली होती की, एका अनोळखी कुरिअर बॉयने तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला आणि तिचे अर्धनग्न फोटो काढून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. मात्र सखोल तपासात हा व्यक्ती तरुणीचा पूर्वीपासूनचा ओळखीचा मित्र असल्याचे निष्पन्न झाले. व्हॉट्सअॅप चॅट, फोटो, सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल डेटा तपासणीच्या आधारावर हे स्पष्ट झाले की, दोघांनी परस्पर संमतीने फोटो काढले होते. नंतर तरुणीने मुद्दाम फोटो क्रॉप करून खोटा संदेश तयार केला आणि आरोपीवर आरोप लावले. तपासात पुढे असेही समोर आले की, तरुणीने आरोपीचा चेहरा लपवून बनावट पुरावे तयार केले, मोबाईलमधील मूळ फोटो डिलिट केले आणि पोलीस व वैद्यकीय अधिकाऱ्यांची खोट्या माहितीने दिशाभूल केली. या खोट्या तक्रारीमुळे पोलिसांचे ५०० हून अधिक कर्मचारी तपासात गुंतले होते, आणि तब्बल २५० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली होती. या प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, संबंधित तरुणीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम २१२, २१७, २२८ व २२९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याला गंभीर स्वरूपाचा हेतूपुरस्सर गैरवापर असे संबोधले आहे. ‘तरुणीविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दिल्याचा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आली आहे.’ – राजकुमार शिंदे (उपायुक्त, परिमंडळ पाच)