Pune : दरोडा टाकणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद

पुणे : नागरिकांचे मोबाइल हिसकावून गायब होणार्या टोळीचा खडकी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून ८ लाख रुपये किमतीचे तब्बल ३० मोबाइल जप्त केले आहेत. टोळीने पुणे, पिंपरी- चिंचवडसह अनेक ठिकाणी लूटमार केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, उपनिरीक्षक दिग्विजय चौगुले उपस्थित होते. सर्व आरोपी १८ ते २२ वयोगटांतील आहेत. ते रेल्वेने पुण्यात आले होते.
अभिषेक राजकुमार महता (वय २२, रा. बिहार) दिनेश राजकुमार नोनिया (वय १८, रा. कटियारा बिहार) रोहनकुमार विलोप्रसाद चौरोसिया (वय १९, रा. महाराजपूर, जि. साहेबगंज, झारखंड) राजेश धर्मपाल नोनिया (वय १८ रा. जि बर्धमान, पश्चिम बंगाल) सचिन सुखदेव कुमार (वय २०, रा. साहेबगंज, झारखंड ) उजीर सलीम शेख (वय १९, रा. अहमदाबाद, जि. कटियारा बिहार) अमिर नूर शेख (वय १९, रा. झारखंड) सुमित मुन्ना महातोकुमार (वय १९, रा. झारखंड) कुणाल रतन महातो (वय २१, रा. जि कटियारा बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
भारतत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने १४ एप्रिलला पुणे पोलीस बंदोबस्तात असताना संधीचा फायदा घेऊन खडकी पोलीस ठाणे हद्दीतील वाकडेवाडी जुना पुणे मुंबई हायवेवरील रोडवरील भारत पेट्रोल पंपांवर दरोडा टाकण्याच्या तयारीने एक टोळी दबा धरून बसली असल्याची माहिती तपास पथकप्रमुख उपनिरीक्षक दिग्विजय चौगले यांना मिळाली.
पोलिसांनी तेथे शिताफीने यशस्वी छापा टाकून पाठलाग करीत ६ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्यापैकी पळून गेलेल्या तिघांनाही २४ तासांत अटक केली. आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांच्याकडे ८ लाख रुपये किमतीचे ३० मोबाइल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. टोळक्याने पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये मोबाइल चोरी व जबरी चोरी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी आणखी तपास सुरू आहे.





