Pune: महिला अत्याचार रोखण्यासाठी गस्त वाढवावी; डाॅ. गोऱ्हे यांच्या पोलिसांना सूचना

पुणे – शहरात घडत असलेल्या महिलांवरील अत्याचार, लहान मुलांचे लैंगिक शोषण या घटनांमुळे पोलिसांनी अधिक सतर्क राहावे. अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी गस्त वाढवावी. शाळांमध्ये “बॅड टच गुड टच’ उपक्रम राबवून मुले आणि पालकांमध्ये जागृती करावी.
निर्जनस्थळी पोलीस चौकी अद्ययावत आणि सीसीटीव्ही बसवून तेथील हालचालींवर देखरेख व्हावी, असा सूचना दिल्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
डॉ. गोऱ्हे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांतील आरोपींना पकडून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी. बोपदेव घाट, दिवे घाट, वेताळ टेकडी, एनडीए परिसर यासह अन्य निर्जनस्थळी गस्त वाढवावी.
रात्रीच्या वेळी प्रभावशील प्रकाशझोत आणि भोंग्यांची व्यवस्था करावी. सीसीटीव्ही लावावेत. महिला दक्षता समित्यांच्या बैठकांमधून फलनिष्पती काय झाली, तक्रारींचा निपटारा कसा केला याबाबतचा कृती अहवाल दक्षता समितीमधील महिला सदस्यांना द्यावा. यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात येऊ शकते, असे डाॅ. गोऱ्हे म्हणाल्या.
…तर तातडीने तक्रार नोंदवा
घरातील व्यक्तींकडूनच अत्याचार होत असल्याचे काही ठिकाणी दिसून येते. त्यावेळी नातेवाईकांनी पुढे येऊन तक्रार द्यावी. शाळा, महाविद्यालयाच्या तसेच स्कुल बसचालक आणि वाहकाची चारित्र्य पडताळणी व्हावी. शहरात नवीन पोलीस ठाणे वाढविण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यादृष्टीने प्रयत्न सूरू असल्याची माहिती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.





