Pune: आरटीईअंतर्गत वाढीव प्रवेश होणार नियमित

पुणे – शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेत पहिली, पूर्वप्राथमिकच्या वर्गातील प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त होणार असल्यास शाळांनी त्याबाबतची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक आहे. संबंधित वाढीव प्रवेश नियमित करण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आरटीई अंतर्गत वाढीव प्रवेश नियमित होणार आहे.
आरटीईच्या प्रवेशप्रक्रियेत केलेल्या बदलास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यामुळे यंदा आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेला जवळपास विलंब झाला. राज्य सरकारने आरटीई प्रवेशप्रक्रियेत केलेला बदल उच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवून पूर्वीप्रमाणेच आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले.
तसेच आरटीईच्या २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश न्यायालयाने अबाधित ठेवले आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना २५ टक्के प्रवेश देणे बंधनकारक आहे. २५ टक्के राखीव जागांवर आधीच प्रवेश दिलेल्या शाळांनीही पहिली, पूर्वप्राथमिकच्या वर्गात वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा आहे.
त्यामुळे संबंधित शाळांतील पहिली, पूर्वप्राथमिकच्या वर्गातील प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश होणार असल्यास शाळांनी त्याबाबतची माहिती शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालकांना द्यावी. त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी ते प्रवेश नियमित करून द्यावेत, अशा स्पष्ट सूचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.





