Pune : सुरक्षारक्षकांची संख्या वाढविणार; महिला सुरक्षारक्षकही नेमणार

पुणे : स्वारगेट बसस्थानकावरील बलात्काराच्या घटनेनंतर येथील सुरक्षेचा मुद्दा एरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वारगेट एसटी प्रशासनाकडून ३६ सुरक्षारक्षकांची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये सहा महिला सुरक्षारक्षक देखील असणार आहेत, असे एसटी प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
सुरक्षित प्रवासासाठी एसटीला प्राधान्य देण्यात येते. विशेषत: सवलतीमुळे सध्या महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. परंतु मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर एसटी बसस्थानकात सुरक्षेची कमतरता असल्याचे दिसून आले. याला एसटी प्रशासनाला जबाबदार धरण्यात आले आहे.
त्यामुळे बसस्थानक आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर शिवाजीनगर एसटी स्थानकातील काही सुरक्षारक्षक स्वारगेट स्थानकात तैनात करण्यात आले आहे.
स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षा वाढविण्यासाठी सुरक्षारक्षकांची संख्या वाढविण्यात येणार आहे. यासंबंधी प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.
– प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, एसटी पुणे विभाग





