Pune : अनेक ठिकाणी सरकारच कायदे पाळत नाही

पुणे : दिव्यांगांच्या क्षेत्रात अजूनही खूप काही करण्यासारखे आहे; पण जे कायदे केले आहेत, ते अनेक ठिकाणी सरकारच पाळत नाही, अशी अवस्था आहे, अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केली. केलेले कायदे सरकारने तरी पाळले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त करून, १०० दिवसांच्या टार्गेटमध्ये आम्ही ते पाळण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केल्याचे, फडणवीस यांनी नमूद केले.
भारत विकास परिषदेच्या नवभारत फाउंडेशनने साडेचार तासांत एकूण ८९२ दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव बसविण्यात आले. या विश्वविक्रमाची घोषणा गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसचे मुख्य प्रतिनिधी स्वप्नील डांगरीकर यांनी केली आणि प्रमाणपत्र दिले. हे प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भारत विकास परिषदेला प्रदान करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकात पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सागर ढोले-पाटील, राजेश पांडे, भारत विकास परिषदेचे दत्ता चितळे, विनय खटावकर, राजेंद्र जोग उपस्थित होते.
दिव्यांगांच्या कायद्यांमध्ये सुसूत्रता येण्यासाठी सरकारी वेबसाइटपासून ते आमच्या कार्यालयापर्यंत सुगमता असली पाहिजे. त्यामुळे ती करण्याला आम्ही सुरुवात केली आहे. ते काम लवकरच पूर्ण होईल, असे फडणवीस म्हणाले. भारतात सेवेची परंपरा खूप मोठी असून, सेवाकार्याचा संस्कार आपल्या प्रत्येकात आहे. सेवाकार्य करण्यासाठी सरकारसोबत स्वयंसेवी संस्था उभ्या राहिल्या, तर कार्याची गती अधिक वाढेल, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.
या केंद्राच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ १६ डिसेंबर २०२४ रोजी रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत झाला होता. त्यादिवशी ८०० पेक्षा जास्त दिव्यांग व्यक्तींच्या पायाची मोजमापे घेण्यात आली होती. त्यांना मोफत आज कृत्रिम पाय (मॉड्युलर फूट) आणि कृत्रिम हात बसवण्यात आले आणि त्याचाच हा विश्वविक्रम झाला आहे, असे खटावकर यांनी सांगितले.
सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून दिव्यांग गरजूंची सेवा आपुलकीने करणे हे दायित्व, कर्तव्य आणि सामाजिक ऋण भारत विकास परिषदेने जोपासले असून, संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा आणि समर्पण या पंचसूत्रीच्या आधारावर संपूर्ण देशभर सुमारे १५०० शाखांच्या माध्यमातून हे सामाजिक कार्य सुरू आहे, असे चितळे यांनी नमूद केले.





