Pune : हडपसर औद्योगिक इस्टेट परिसरात शेजारील मोकळ्या प्लॉटमध्ये मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर माती व कचऱ्याचे बेकायदेशीर डंपिंग सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. या डंपिंगमुळे कालव्याला धोका निर्माण होऊन पूरस्थिती, आरोग्यविषयक समस्या आणि आर्थिक नुकसान होण्याची भीती वारंवार व्यक्त करण्यात आली होती. मात्र संबंधित यंत्रणांनी याकडे दुर्लक्ष केल्याने सोमवारी पहाटे कालवा फुटून ही भीती खरी ठरली. याबाबत उद्योजकांनी महापालिका व जलसंपदा विभागाकडे अनेकदा लेखी तक्रारी करून खबरदारी घेण्याची मागणी केली होती. १५ एप्रिल २०२५ रोजी सर्वे नं. ११४, प्लॉट नं. ३२ बी व २९ येथे कार्यरत असलेल्या एलोमॅटिक (इंडिया) प्रा. लि. कंपनीने पुणे महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याकडे तक्रार नोंदवून तातडीने कारवाईची मागणी केली होती. Pune कंपनीच्या मते, शेजारील प्लॉटमध्ये मातीचे मोठे ढिगारे तयार झाले असून कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. डासांची पैदास वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. विशेषतः पावसाळ्यात हा कचरा व माती नाल्यात (कलवट) अडकल्यास पूरस्थिती निर्माण होण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे कंपनीच्या संरक्षक भिंतीसह मालमत्तेलाही धोका निर्माण होऊ शकतो, असेही नमूद करण्यात आले होते. कोट्यवधींची यंत्रसामग्री पाण्यात – Pune दोन वर्षांपूर्वी महापालिकेने सुमारे ३ कोटी रुपये खर्चून येथे ड्रेनेज व रेन वॉटर लाईनचे काम केले होते. मात्र यापूर्वीही चार वर्षांपूर्वी अशाच परिस्थितीमुळे परिसरातील ३० ते ४० कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. संबंधित कंपनीला तेव्हा सुमारे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. सोमवारी झालेल्या घटनेत कंपनीच्या पार्किंगमधील सुमारे १३ दुचाकी आणि तीन नवीन कार पाण्याखाली गेल्या. तसेच अनेक उद्योगांमध्ये पाणी शिरून कोट्यवधींची यंत्रसामग्री पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली आहे. Pune : हडपसरमध्ये अखेर भीती खरी ठरली; अनधिकृत डंपिंगमुळे कालवा फुटला दरम्यान, या भागात शहरातील मोठ्या बांधकाम व्यावसायिकांकडून राडारोडा टाकला जात असल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे. विरोध केल्यास दमदाटी व ॲट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले. कालव्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व झोपड्या उभ्या राहिल्या असून, जलसंपदा विभागाने केलेली कारवाईही निष्फळ ठरली आहे. सुरक्षा रक्षकांनाही धमकावून पुन्हा अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप आहे. Pune याशिवाय, परिसरात सायंकाळी अंधारात नशा करणाऱ्यांची वर्दळ वाढली असून याबाबत पोलिसांनाही माहिती देण्यात आली आहे. तरीही सर्व संबंधित विभागांकडून दुर्लक्ष होत असल्याने उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, परिसरातील अनेक कंपन्यांमध्ये पाणी शिरल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात उद्योजकांनी तातडीची बैठक बोलावली असून नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. त्यानंतर संबंधित विभागांना संयुक्त निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती उद्योजक संजय कांकरीया यांनी दिली आहे.