PUNE: अवैध पार्ट्या, बनावट मद्य वाहतुकीवर नजर

पुणे – राज्य उत्पादन शुल्क विभागाने थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली असून, अवैध पार्ट्या, बनावट मद्याची वाहतूक विक्री करणार्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सतरा पथके तैनात केली आहेत. पन्नास अधिकारी आणि सव्वासे कर्मचार्यांच्या भरारी पथकांची जिल्ह्यात करडी नजर असणार आहे.
नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी बहुतांश ठिकाणी मोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये प्रशासनाची परवानगी न घेता अनेक ठिकाणी असे उद्योग चालतात. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाचा महसूल बुडला जातो. तसेच या पार्ट्यात राज्यात विक्रीस बंदी असलेल्या गोवा बनावटीच्या मद्याबरोबरच स्वस्तातील बनावट मद्याचा विक्री केली जाण्याचीही शक्यता असते. त्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ही भरारी पथके जिल्ह्यात कारवाई करणार आहेत.
रात्रगस्त अन् नाकाबंदी
राज्यात विक्रीस बंदी असलेल्या मद्याची तस्करी रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभाच्या पथकाने रात्रगस्ती बरोबरच जिल्ह्यात प्रवेश करणार्या रस्त्यावर नाकाबंदी मोहीम हाती घेतली आहे. कोण-कोणत्या मार्गाने जिल्ह्यात बाहेरील मद्य तस्करी केले जाते याची माहिती जमा करण्यात आली आहे. या पथकांना याबाबत विशेष सूचना देखील देण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत.
तीन ते पाच वर्षाची शिक्षा, आर्थिक दंड
राज्य उत्पपादन शुल्क विभागाच्या कायद्याचेे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात संबंधीत व्यक्तीला तीन ते पाच वर्षाची शिक्षा असून, पंचवीस ते पन्नास हजार रुपयांच्या आर्थिक दंडाची तरतुद आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करू नये असे आवाहन उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.
“थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर अवैध पद्धतीने पार्ट्या आयोजित करण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा पार्ट्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष आहे. त्यासाठी जिल्ह्यात तब्बल सतरा भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच राज्या विक्रीस बंदी असलेल्या मद्याची तस्करी रोखण्यासाठी नाकाबंदी, तपासणी नाके उभारून रात्री गस्त घातली जाते आहे.” – चरणसिंग रजपूत, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे





