PUNE : विमा कंपनी नाही तर, पालिकाच राबविणार शहरी गरीब योजना

पुणे – शहरातील एक लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या आर्थिक दुर्बल घटकांमधील कुटुंबासाठीच्या शहरी गरीब योजना कोणत्याही परिस्थितीमध्ये विमा कंपनीकडे दिली जाणार नाही. ही योजना पूर्वीप्रमाणेच महापालिका राबविणार असल्याचा खुलासा महापालिकेचे प्रभारी आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी केला आहे.
शहरी गरीब विमा कंपनीकडे देण्यासंदर्भात कधीही चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. महापालिकेकडून विमा कंपनीला ही योजना देण्याबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर महापालिकेच्या कामगार संघटना तसेच राजकीय पक्षांकडून त्यास विरोध होऊ लागला आहे. महापालिकेने केवळ विमा कंपनीचा फायदा होत असल्याने या वर्षीच मिळकतकर विभागासाठीची पंडित दिनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना बंद केलेली असताना ही शहरी गरीब योजना विमा कंपनीला देण्याचे कारणच काय, असा सवाल उपस्थित केला जात होता.
याबाबत बोलताना बिनवडे म्हणाले की, आरोग्य प्रमुखांना विमा कंपनीचे पत्र आल्याची माहिती नाही किंवा आरोग्य विभागामध्ये काय चर्चा झाली, याची कल्पना नाही. खाली काहीही चर्चा झाली तरी अंतिम निर्णय आयुक्तांच्याच पातळीवर घेतला जाणार असल्याचेही बिनवडे यांनी स्पष्ट केले.
शहरी गरीब योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी योजनेची प्रक्रीया ऑनलाइन करण्यात येत आहे. मात्र, ही योजना विमा कंपनीकडे देण्याची कोणतीही चर्चा वरिष्ठ पातळीवर झालेली नाही, असे महापालिकेचे प्रभारी आयुक्त रवींद्र बिनवडे म्हणाले.





