पुणे : ‘मी शनिवारवाडा बोलतोय’ ; महापालिकेकडून पर्यटकांसाठी आता “डिजिटल ऑडिओ गाइड’

पुणे – अठराव्या शतकात, पूर्ण हिंदुस्थानचे राजकीय केंद्रबिंदू असलेला पुणे शहरातील, शनिवारवाडा पाहण्यासाठी देश-विदेशातील अनेक पर्यटक येतात. आता, शनिवारवाड्याचा इतिहास पर्यटकांना डिजिटल ऑडिओ गाइडच्या स्वरूपात उपलब्ध होणार आहे. यासाठीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीत ठेवण्यात आला आहे. पालिकेकडून वाडा परिसरात “डिजिटल ऑडिओ गाइड म्हणजे “क्यु. आर.कोड’ बसविण्यात येणार आहे. याद्वारे मोबाइल मध्येच हे संभाषण डाऊनलोड करून पर्यंटकांना ऐकता येणार आहे. “गुंज इंडिया’ या संस्थेकडून ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
पुणे शहराच्या इतिहासाची साक्ष देणारा शनिवारवाडा जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. महापालिकेकडून हेरीटेज वॉकच्या माध्यमातून तसेच “लाइट ऍड साऊंड शो’च्या माध्यमातून पर्यंटकांना माहिती दिली जात असली तरी या दोन्ही उपक्रमांना वेळेची मर्यादा आहे. याच कारणातून पर्यटकाना “डिजिटल ऑडिओ गाइड उपलब्ध करून दिला जाणार आहे.
या ऑडिओ गाइडद्वारे मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नापैकी 50 टक्के रक्कम महापालिकेस दिली जाणार असून 50 टक्के रक्कम मे.गुंज इंडिया घेणार आहे. या “डिजिटल ऑडिओ गाइड” साठी सॉफ्टवेअर, ध्वनीसंभाषण यासाठी येणारा खर्च मे. गुंज इंडिया यांच्याकडून करण्यात येणार आहे. तर शनिवारवाड्या बाहेरील परिसरात स्टेलनेस स्टीलमध्ये क्यू,आर. कोड लावण्यासाठीचा खर्च महापालिका करणार आहे.
भाषेनुसार शुल्क…
शनिवारवाडा बाहेरील परिसरात स्टेलनेस स्टीलचे क्यू.आर.कोड फलक व प्रवेशद्वाराजवळ क्यू.आर.कोड फलक बसवून पर्यटकाना ते ‘ऑनलाइन’ घेण्याची व्यवस्था असणार आहे. ध्वनीसंभाषणसह मोबाइलवर मिळणारी माहिती मराठीत 50 रुपये, 75 रुपये तर इंग्लिश मध्ये 100 भरून प्राप्त होईल. विदेशी पर्यटकांनी मागणी केल्यास, जर्मनी, जपानी अशा भाषा मध्येही देण्यात येणार आहे.




